दहशत झुगारत जल्लोष!

By Admin | Updated: February 15, 2015 02:25 IST2015-02-15T02:25:13+5:302015-02-15T02:25:13+5:30

‘व्हॅलेन्टाईन डे’ हा प्रेमाचा दिवस़ प्रेम हे जसे शाश्वत आहे तसेच ते सार्वत्रिकही आहे़ त्याला पूर्व वा पश्चिमच्या संस्कृतीत विभागता येत नाही़ ...

Shock, shock! | दहशत झुगारत जल्लोष!

दहशत झुगारत जल्लोष!

नागपूर : ‘व्हॅलेन्टाईन डे’ हा प्रेमाचा दिवस़ प्रेम हे जसे शाश्वत आहे तसेच ते सार्वत्रिकही आहे़ त्याला पूर्व वा पश्चिमच्या संस्कृतीत विभागता येत नाही़ परंतु स्वमर्जीने शहरातील संस्कृतीरक्षणाचा ठेका घेणाऱ्यांना ही गोष्ट मान्य नाही़ म्हणूनच या ‘पराक्रमी पुरुषांनी’ काल गुंडागर्दीच्या बळावर प्रेमीयुगुलांना धमकावून पाहिले. असे केल्याने आजच्या ‘व्हॅलेन्टाईन डे’ला कुणीही घराबाहेर पडणार नाही, असा त्यांचा होरा होता. परंतु तरुणाईने या कथित संस्कृतीरक्षकांची दहशत झुगारून प्रेमाचा हा उत्सव मोठ्या आनंदात साजरा केला. त्यांच्या या आनंदावर विरजण पडू नये म्हणून पोलिसांनीही अगदी चोख बंदोबस्त ठेवला होता. शहरातील प्रसिद्ध उद्यान व सार्वजनिक ठिकाणांवर पोलिसांचा खडा पहारा होता़ अनेकांनी कुटुंबींयासोबत 'व्हॅलेन्टाईन डे'चा आनंद लुटला. शिवसेनेच्या कथित कार्यकर्त्यांच्या गुंडागर्दीवर चौफेर टीका झाल्याने व यांच्यातील काहींना पोलिसांनी अटक केल्याने आज पुन्हा कुणी असा उपद्व्याप करण्याची हिंमत केली नाही़ काही प्रेमीयुगुलांनी एकांतात भेटण्याचे टाळले मात्र मित्रांच्या ग्रुपसोबत त्यांची धम्माल सुरूच होती.
हौसले की उडान : संस्कृती रक्षणाच्या नावाखाली ‘व्हॅलेन्टाईन डे’च्या विरोधात धुडगूस घालणाऱ्या तरुणांना चपराक मारणारा उपक्रम तरुणाईने शनिवारी राबविला. ‘हौसले की उडान’ कार्यक्रमाच्या माध्यमातून या तरुणाईने शारीरिक दुर्बल असलेल्या मुलांना मायेचा घास तर भरविलाच, शिवाय त्यांच्या आनंदात सहभागी होऊन हा दिवस सार्थक ठरविला. सिव्हिल लाईन्स येथील दक्षिण मध्य विभाग सांस्कृतिक केंद्रातील या मुक्त वातावरणात ४५ शाळांमधील तब्बल ७०० मुले मनमुराद खेळली-बागडली.
व्हॅलेन्टाईन विरोधकांची पळापळ, सहा गजाआड, अनेक फरार
पोलिसांचा गाफिलपणा आणि व्हॅलेन्टाईन विरोधकांच्या गुंडगिरीवर सर्व स्तरातून टीका झाली. परिणामी आज सकाळपासूनच पोलीस सक्रिय झाले. शहरातील बहुतांश उद्याने आणि तलावाच्या काठावर पोलिसांनी तगडा बंदोबस्त लावला. शुक्रवारी प्रेमीयुगुलांशी असभ्य वर्तन करून भररस्त्यात तरुणींची छेड काढणाऱ्या आरोपींविरोधात गिट्टीखदान आणि अंबाझरी ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले. त्यातील सहा आरोपींना गिट्टीखदान पोलिसांनी अटक केली.
राडेबाज शिवसैनिकांवर होणार कारवाई
'व्हॅलेंटाईन डे' ला विरोध करणाऱ्या राडेबाज शिवसैनिकांची पक्षातून हकालपट्टी करण्यात येणार असल्याचे संकेत प्राप्त झाले आहेत. याबाबत अंतिम निर्णय लवकरच होणार असल्याची माहिती शिवसेनेतील सूत्रांनी दिली. 'व्हॅलेंटाईन डे'च्या एक दिवस आधीच म्हणजे शुक्रवारी काही शिवसैनिकांनी फुटाळा, बॉटनिकल गार्डन, अंबाझरी उद्यान आदी भागात प्रेमीयुगुलांना पिटाळून लावले होते. विशेष म्हणजे 'व्हॅलेंटाईन डे'ला विरोध करण्याची पक्षाची भूमिका नसतानाही स्थानिक कार्यकर्त्यांनी अशा प्रकारचा धुडगूस घातल्याने पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी याची गंभीर दखल घेतली. शुक्रवारी रात्रीच यासंदर्भात शिवसेनेचे पूर्व विदर्भ संपर्क प्रमुख व राज्याचे आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांनी घटनेची माहिती घेतली.

Web Title: Shock, shock!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.