वैदर्भीय कलावंतांच्या चित्र आणि स्कल्पचरने रंगणार श्लोक प्रदर्शन
By Admin | Updated: January 9, 2015 00:47 IST2015-01-09T00:47:48+5:302015-01-09T00:47:48+5:30
प्रादेशिक चित्रकार आणि शिल्पकारांना समोर आणण्यासाठी आणि कलात्मकतेला प्रोत्साहन देण्यासाठी ‘श्लोक’ ही चळवळ सुरू करण्यात आली आहे. अल्पावधीतच या संकल्पनेला संपूर्ण महाराष्ट्रात प्रचंड प्रतिसाद लाभला.

वैदर्भीय कलावंतांच्या चित्र आणि स्कल्पचरने रंगणार श्लोक प्रदर्शन
जागतिक ख्यातीचे कलावंत वासुदेव कामत यांच्या हस्ते उद्घाटन : दर्डा कलाविथिकेत रविवारी प्रारंभ
नागपूर : प्रादेशिक चित्रकार आणि शिल्पकारांना समोर आणण्यासाठी आणि कलात्मकतेला प्रोत्साहन देण्यासाठी ‘श्लोक’ ही चळवळ सुरू करण्यात आली आहे. अल्पावधीतच या संकल्पनेला संपूर्ण महाराष्ट्रात प्रचंड प्रतिसाद लाभला. त्यामुळेच श्लोकच्या प्रदर्शनातील कलाकृती पाहण्यासाठी कलारसिकांमध्ये कुतूहल असते. यंदा नागपूर विभागातील प्रदर्शन रविवार दि. ११ जानेवारीपासून जवाहरलाल दर्डा कलाविथिकेत प्रारंभ करण्यात येणार असून यात वैदर्भीय कलावंतांच्या उत्तमोत्तम कलाकृती रसिकांना भुरळ पाडणार आहेत.
‘श्लोक’ प्रदर्शनाची संकल्पना शीतल ऋषी दर्डा यांची आहे. त्यांच्या कल्पनेतूनच या प्रदर्शनाला प्रारंभ झाला आणि अल्पावधीत या प्रदर्शनाने कलारसिकांचे लक्ष वेधले आहे. जागतिक स्तरावरही ‘श्लोक’ चित्र प्रदर्शनाची दखल घेण्यात आली आहे. हे प्रदर्शन महाराष्ट्रात एकूण पाच ठिकाणी आयोजित करण्यात येते. यात नागपूर, मुंबई, पुणे, नाशिक आणि औरंगाबादचा समावेश आहे. या पाच ठिकाणी महाराष्ट्रातील संबंधित विभागाचे प्रतिनिधित्व उमटते. या प्रदर्शनाचे उद्घाटन आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ‘पोर्ट्रेट’ कलावंत वासुदेव कामत यांच्या हस्ते ११ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता करण्यात येईल. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून लोकमत वृत्तपत्र समूहाच्या ‘एडिटोरिअल बोर्ड’चे चेअरमन व राज्यसभा सदस्य विजय दर्डा, श्लोकच्या संचालिका शीतल ऋषी दर्डा उपस्थित राहतील. कामत यांचा पौराणिक विषयांचा अभ्यास करून त्याला वास्तववादी शैलीत चितारण्याचा प्रयत्न रसिकांना अवाक करणारा आहे. याप्रसंगी कला आणि कलेचा पौराणिक संदर्भ विषयावर त्यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले असून त्यानंतर दुपारी १२ वाजता ते ‘पोर्ट्रेट’ चे प्रात्यक्षिकही सादर करणार आहेत. कलारसिकांसाठी त्यांना प्रत्यक्ष अनुभविणे ही पर्वणीच असणार आहे.
या प्रदर्शनासाठी विदर्भातील चित्रकार आणि शिल्पकार यांच्याकडून त्यांच्या कलाकृती मागविण्यात आल्यात. त्यानंतर मुंबई येथे एका तज्ज्ञ समितीने कलाकृतींची निवड केली. आलेल्या कलाकृतीतून निवडण्यात आलेल्या कलाकृतींचे हे प्रदर्शन आहे. यात वय वर्षे ६ ते वयाची ७१ वर्षे झालेल्या निवृत्त कलाशिक्षकांचा सहभाग आहे. हे प्रदर्शन कलारसिकांसाठी १३ जानेवारीपर्यंत सकाळी १०. ३० ते रात्री ८. ३० पर्यंत खुले राहणार असून या सर्व कलाकृतींचा आनंद रसिकांनी घ्यावा, असे आवाहन जवाहरलाल दर्डा कलाविथिकेचे समन्वयक मिलिंद लिंबेकर यांनी केले आहे. (प्रतिनिधी)