शिवसेनेला हिंदी समजत नाही - श्रीहरी अणे

By Admin | Updated: June 19, 2016 08:09 IST2016-06-19T02:46:58+5:302016-06-19T08:09:03+5:30

मराठी भाषिकांचे एकच राज्य असावे, अशी शिवसेना-मनसेची भूमिका आहे परंतु हिंदी भाषिकांची अनेक राज्ये आहेत. विदर्भातील भाषा मराठी-हिंदी आहे.

Shivsena does not understand Hindi - Shreehi Ane | शिवसेनेला हिंदी समजत नाही - श्रीहरी अणे

शिवसेनेला हिंदी समजत नाही - श्रीहरी अणे

श्रीहरी अणे यांचा आरोप : शेतकऱ्यांना हवी मदत
नागपूर : मराठी भाषिकांचे एकच राज्य असावे, अशी शिवसेना-मनसेची भूमिका आहे परंतु हिंदी भाषिकांची अनेक राज्ये आहेत. विदर्भातील भाषा मराठी-हिंदी आहे. शिवसेनेला हिंदी भाषा येत नसल्याने शिवसेना संभ्रम निर्माण करीत असल्याचा आरोप विदर्भवादी नेते व महाराष्ट्राचे माजी महाधिवक्ता अ‍ॅड. श्रीहरी अणे यांनी शनिवारी केला. राष्ट्रीय जनसुराज्य पार्टीतर्फे जय जलाराम मंगल कार्यालयात आोयोजित वेगळ्या विदर्भ राज्यासाठीच्या जाहीर सभेत ते बोलत होते.

व्यासपीठावर व्हीकॅनचे अध्यक्ष अ‍ॅड. मुकेश समर्थ, जनसुराज्यचे अध्यक्ष राजेश काकडे, विदर्भ राज्य आघाडीचे कार्याध्यक्ष अ‍ॅड. स्वप्नील संन्याल, प्रकाश निमजे, चंद्रभान रामटेके, महिला शहर अध्यक्ष ज्योती गांधी, शहराध्यक्ष हरेश निमजे, योगीराज वाहने आदी उपस्थित होते. शिवसेनेचा आज ५० वा वर्धापन दिन आहे. अणे यांनी केलेल्या या बोच-या टीकेला शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे काय उत्तर देतात याकडे आता लक्ष लागले आहे. 

शिवसेना-मनसेची भूमिका मराठी भाषिकांचे एकच राज्य असावे अशी आहे परंतु डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी याला ६० वर्षापूर्वीच उत्तर दिले आहे. ही कल्पनाच चुकीची असून विदर्भातील लोकांना मराठीइतकीच हिंदी भाषा सोपी वाटते. शिवसेनेचे म्हणणे विचारात घेतले तर त्यांना इतिहास माहीत नसल्याचे दिसते. छत्रपती शिवाजी महाराजांचे साम्राज्य व त्यानंतर पेशव्याचे राज्य देशाच्या ६० टक्के भूभागावर होते. त्यामुळे मराठी माणसाचे एक राज्य ही कल्पनाच चुकीची असल्याचे त्यांनी सांगितले.

स्वातंत्र्यापूर्वीची विदर्भाची मागणी आहे. लोकनायक बापुजी अणे यांनी सी.पी.अ‍ॅन्ड बेरार राज्य बरखास्त करू नका, अशी भूमिका मांडली होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीही विदर्भासह छोट्या संघ राज्याचे समर्थन केले होते. त्यांनी विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र व मुंबई (केंद्रशासित) राज्ये व्हावे, अशी भूमिका मांडली होती. संयुक्त महाराष्ट्रासाठी नव्हे तर मुंबई महाराष्ट्रात राहावी, यासाठी हुतात्मे झाले होते. तसेच स्वंतत्र विदर्भासाठीही हुतात्मे झाले असल्याचे अणे यांनी निदर्शनास आणले.

आजवर विदर्भातील साडेचार मुख्यमंत्री झाले. यात नाशिकराव तिरपुडे उपमुख्यमंत्री म्हणजे अर्धे मुख्यमंत्री होते. परंतु विदर्भाला न्याय मिळालेला नाही. दांडेकर समितीने विदर्भाच्या मागासलेपणाची कारणे दिली होती. राज्यक र्त्यांनी विदर्भाचा निधी पश्चिम महाराष्ट्राकडे वळता केला होता. विदर्भ -मराठवाड्यातील सिंचन प्रकल्पासाठी ९० टक्के निधी उपलब्ध केला परंतु कामे १५ टक्केच झालेली आहेत. हा पैसा जिरवणारे शोधून त्यांना शिक्षा व्हावी, असे मत अणे यांनी मांडले. यावेळी राजेश काकडे, चंद्रभान रामटेके, प्रकाश निमजे, नंदकिशोर रामटेके आदींनी मार्गदर्शन केले. (प्रतिनिधी )

शेतकऱ्यांपेक्षा मेट्रो महत्त्वाची?
गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा अधिक आत्महत्या होण्याची चिन्हे आहेत. शासनाने थकीत कर्जाचा विचार न करता शेतकऱ्यांना मोफत बियाणे उपलब्ध करावे. शेतकरी ही रक्कम परत करू न शकल्यास शासनाने ती करावी. परंतु सरकाची मानसिकता नाही. शेतकऱ्यांना पैसा देण्यापेक्षा मेट्रो रेल्वे, इंटरनॅशननल हब महत्त्वाचा वाटतो. शेतकऱ्यांपेक्षा मेट्रो महत्त्वाची आहे का असा सवाल असे यांनी केला.विदर्भाचा आवाज बुलंद करण्यासाठी बापुजी अणे यांनी यवतमाळात ‘लोकमत’ सुरू केला होता. परंतु पुढे स्वातंत्र्य संग्राम सैनिक जवाहरलाल दर्डा यांनी लोकमत राष्ट्रीय स्तरावर पोहचविला. मध्यप्रदेशातही हिंदी-मराठी बोलणारे होते, असे श्रीहरी अणे म्हणाले.

Web Title: Shivsena does not understand Hindi - Shreehi Ane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.