शिवसेनेचा जल्लोष म्हणजे दुसऱ्याच्या घरी मुलगा झाल्यावर मिठाई वाटण्यासारखे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 21:42 IST2020-12-12T21:42:34+5:302020-12-12T21:42:54+5:30
Devendra Fadanavis Nagpur News शिवसेनेची परिस्थिती अशी आहे की दुसऱ्याच्या घरी मुलगा झाला की ते मिठाई वाटतात. त्यांना या निवडणुकीत काहीच मिळाले नाही, तरी ते मिठाई वाटत सुटले आहे, या शब्दांत विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सेनेवर टीका केली.

शिवसेनेचा जल्लोष म्हणजे दुसऱ्याच्या घरी मुलगा झाल्यावर मिठाई वाटण्यासारखे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विधान परिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेला एकही जागा मिळाली नाही. तरीदेखील त्यांच्याकडून जल्लोष करण्यात येत आहे. शिवसेनेची परिस्थिती अशी आहे की दुसऱ्याच्या घरी मुलगा झाला की ते मिठाई वाटतात. त्यांना या निवडणुकीत काहीच मिळाले नाही, तरी ते मिठाई वाटत सुटले आहे, या शब्दांत विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सेनेवर टीका केली. नागपुरात शनिवारी ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षाने जरूर एकत्र लढावे, त्यांना तात्कालिक लाभ मिळतील, मात्र नंतर लाभ आम्हालाच मिळेल, कारण एक मोठी ''''स्पेस'''' आम्हाला मिळते आहे. या तीन पक्षांसाठी एवढ्या जागाच ( मतदारसंघ ) नाही, त्यामुळे त्यांना निवडणुकीत जास्त जागा मिळणार नाही. उत्तर प्रदेश मध्ये त्यांनी हाच प्रयोग केला, मात्र लाभ आम्हाला मिळाला. या तीन पक्षांनी एकत्रित येऊन महाराष्ट्रात ही संधी निर्माण केली आहे, असे फडणवीस म्हणाले.
राज्याच्या राजकारणात पवारांचे मोठे स्थान
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना ८० व्या वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा आहेत. महाराष्ट्राची जडण घडण समजणारे ते नेते आहेत. आमचे राजकीय विचार वेगळे असले तरी त्यांच्याबद्दल आदर आहे, महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांचे वेगळे स्थान आहे, असे प्रतिपादन फडणवीस यांनी केले.