शिवसेनेने टाकला ‘प्रेशर बॉम्ब’

By Admin | Updated: December 6, 2015 02:51 IST2015-12-06T02:51:03+5:302015-12-06T02:51:03+5:30

भाजपच्या कोट्यात असलेली विधान परिषदेच्या नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची जागा स्वबळावर लढण्याचा नारा शिवसेनेने दिला आहे.

Shiv Sena gets 'pressure bomb' | शिवसेनेने टाकला ‘प्रेशर बॉम्ब’

शिवसेनेने टाकला ‘प्रेशर बॉम्ब’

विधान परिषद स्वबळावर लढणार : किशोर कन्हेरे यांची उमेदवारी निश्चित
नागपूर : भाजपच्या कोट्यात असलेली विधान परिषदेच्या नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची जागा स्वबळावर लढण्याचा नारा शिवसेनेने दिला आहे. शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी तडकाफडकी बैठक घेत किशोर कन्हेरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा निर्णय घेतला. विधिमंडळ हिवाळी अधिवेशनाच्या तोंडावर शिवसेनेचे टाकलेल्या या ‘प्रेशर बॉम्ब’मुळे भाजपचे टेन्शन काहीसे वाढले आहे. तर, शिवसेना नेते रामदास कदम हे देखील मुंबईतून रिंगणात असल्यामुळे शिवसेना असे काही करणार नाही, असा दावा भाजप नेत्यांनी केला आहे.
शिवसेनेची शनिवारी स्मृती सभागृह, शारदा चौक, जुना सुभेदार ले-आऊट येथे बैठक झाली. तीत खा. कृपाल तुमाने, माजी खा. प्रकाश जाधव, माजी आ. आशिष जैस्वाल, सहसंपर्क प्रमुख किशोर कन्हेरे, जिल्हाध्यक्ष पांडुरंग बुराडे, राजू हरणे, जि.प. उपाध्यक्ष शरद डोणेकर यांच्यासह भाजपचे महापालिका, नगर परिषदेतील नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य उपस्थित होते. या बैठकीत भाजपने वेळोवेळी शिवसेनेला डावलल्याचा आरोप करीत भाजपविरोधात आक्रमक भूमिका मांडण्यात आली. नेते व सदस्य म्हणाले, समित्यांमध्ये ४० टक्के वाटा शिवसेनेला देण्याचे ठरले होते, मात्र तसे झाले नाही. तालुकानिहाय संजय गांधी निराधार समिती, समन्वय समितीमध्ये ठरल्यामुळे भाजपने प्रतिनिधित्व दिले नाही. विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांच्या नाममात्र जागा देण्यात आल्या. प्रत्येक समितीमध्ये शिवसेनेच्या सदस्याला डावलले जात आहे. शिवसेनेच्या सदस्यांची कामे केली जात नाही.

काँग्रेसला द्या युतीचा प्रस्ताव
नागपूर : शासकीय कार्यक्रमांमध्ये शिवसेनेला निमंत्रित केले जात नाही. उद्घाटन तसेच लोकार्पण कार्यक्रमातही शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना डावलले जाते. सत्तेत सहभागी असतानाही शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची भाजप नेत्यांकडून उपेक्षा केली जात आहे, अशा संतप्त भावना यावेळी सदस्यांनी व्यक्त केल्या. तर शिवसेना नेते म्हणाले, महापालिकेत भाजपने शिवसेनेला उपमहापौरपद देण्याची परंपरा मोडित काढली. जिल्हा परिषदेतही सुरुवातीला राष्ट्रवादीशी युती केली. मेट्रोरिजनच्या निवडणुकीतही शिवसेनेने युतीचा प्रस्ताव दिला असताना केवळ एका जागेसाठी भाजपने प्रस्ताव फेटाळून लावला, अशी नाराजी नेत्यांनी व्यक्त केली. काही नेत्यांसह सदस्यांनी शिवसेनेने स्वबळावर ही निवडणूक लढवावी, अशी रोखठोक भूमिका मांडली. तर, काही मतदारांनी शिवसेनेने उमेदवार दिला नाही तर आम्ही भाजपला मतदान करणार नाही, असे स्पष्ट मत नोंदविले. काही सदस्यांनी तर भाजप-राष्ट्रवादीशी तर युती करू शकते तर शिवसेनेने काँग्रेसशी हातमिळवणी केली तर गैर काय आहे, असा प्रश्न उपस्थित करीत या प्रस्तावावर विचार करण्याची मागणी केली. काँग्रेस व शिवसेनेचे संख्याबळ एकत्र केले तर ही जागा भाजप जिंकू शकत नाही. भाजपला मोठा धक्का देता येईल, असा विचारही काहींनी मांडला. या भावना पक्षप्रमुखांना कळविल्या जातील, असे नेत्यांनी आश्वस्त केले. (प्रतिनिधी)

रामदास कदम रिगणात आहेत हे शिवसेना विसरली का?
जागा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिष्ठेची आहे, याची जाणीव असल्यामुळे शिवसेनेने हे दबावतंत्र आखले आहे. मात्र, मुंबई स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात शिवसेनेचे रामदास कदम रिंगणात आहेत, अकोल्यात आ. गोपीकिसन बाजोरिया लढत आहेत याचा शिवसेनेला विसर पडला का, असा सवाल करीत भाजप नेत्यांनी अप्रत्यक्षपणे शिवसेनेची दुखती रग दाबली आहे. शिवसेना सत्तेत सहभागी आहे. राज्यात विधान परिषदेच्या आठ जागांसाठी निवडणूक होत आहे. एकमेकांच्या मदतीशिवाय कोणतीही जागा जिंकता येणार नाही, हे शिवसेनेलाही चांगलेच ठाऊक आहे. त्यामुळे शिवसेना नागपुरात स्वबळावर लढण्याचा विचार मागे घेईल व भाजपचीच साथ देईल, असा दावा भाजप नेत्यांनी केला आहे.

Web Title: Shiv Sena gets 'pressure bomb'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.