शायनिंग नागपूर

By Admin | Updated: December 20, 2014 02:27 IST2014-12-20T02:27:45+5:302014-12-20T02:27:45+5:30

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरच्या विकासाबाबत विधानसभा निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनांची पूर्ती करण्याच्या दिशेने आश्वासक आणि दमदार पावले टाकली असून

Shining Nagpur | शायनिंग नागपूर

शायनिंग नागपूर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरच्या विकासाबाबत विधानसभा निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनांची पूर्ती करण्याच्या दिशेने आश्वासक आणि दमदार पावले टाकली असून आज त्यांनी विधिमंडळात नागपूरच्या विकासाबाबत विविध कल्याणकारी योजना व प्रकल्पांचा अक्षरश: पाऊस पाडला. मुख्यमंत्र्यांच्या या शायनिंग नागपूरच्या घोषणेने सर्वपक्षीय आमदारही सुखावले.
नागपूर विकास प्राधिकरण
नागपूर सुधार प्रन्यास कायम ठेवत महानगर क्षेत्राच्या विकासासाठी प्राधिकरण करण्याची घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली. या अंतर्गत नासुप्रला वाढीव वित्तीय अधिकार दिले जाणार आहेत. यामुळे महापालिकेच्या हद्दीबाहेरील क्षेत्राचा नियोजनबद्ध विकास होईल. सुविधायुक्त नवे नागपूर वसविण्यास मदत होईल. यातून नागपूरवरील शहरीकरणाचा भार कमी होईल. गृहनिर्माण प्रकल्पांना चालना मिळून नागरिकांना शहरालगत कमी दरात घर उपलब्ध होईल.

पाच किलोमीटरवर उद्योग
नागपूर शहरापासून पाच किलोमीटरनंतर उद्योग उभारणीला मंजुरी दिली जाईल. आधी ही अट २० किलोमीटरची होती. यामुळे शहराच्या हद्दीपासून दूरवर उद्योग उभारले जात होते. या उद्योगांमध्ये काम करणाऱ्या कामगारांना प्रवासावर अधिक खर्च करावा लागत होता. आता त्याची बचत होईल. शहरालगत उद्योग उभारल्या गेल्यामुळे रोजगाराच्या संधी वाढतील.

नोगा फॅक्टरी बुटीबोरीला
सध्या हिंगणा औद्योगिक वसाहतीत असलेली नोगा ही फळप्रक्रिया फॅक्टरी बुटीबोरीला हलवून तिचा विस्तार करण्यात येणार आहे. या प्रकल्पाची सध्याची तीन हजार टन क्षमता पाच हजार टनांपर्यंत नेली जाईल. यामुळे येथील फलोत्पादनाला चालना मिळेल. शिवाय फळांना चांगले दर मिळण्यासही मदत होईल.
गोरेवाडा येथे रेस्क्यू सेंटर
गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालयात तातडीने रेस्क्यू सेंटरचे काम सुरू केले जाईल. यासाठी पुरवणी मागण्यांमध्ये २० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. रेस्क्यु सेंटरमुळे वन्यजीवांवर तातडीने उपचार होतील. यातून वन्यजीव संवर्धन होईल. यातून वन पर्यटनाला चालना मिळेल व रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.
नागपूर परिसरात बुद्धिस्ट सर्किट
नागपूर व परिसरात बुद्धिस्ट सर्किटची उभारणी करण्यासाठी आराखडा तयार करण्याची घोषणा करण्यात आली. नागपूर परिसरात दीक्षाभूमी, चिचोली, कामठी येथील ड्रॅगन पॅलेस, नागलोक, मनसर येथे उत्खननात सापडलेले बौद्धस्तूप, महाबोधी महाविहार, पवनी येथील स्तूप आदी बौद्धस्थळे आहेत. येथे जगभरातील बौद्ध बांधव येतात. या सर्व ठिकाणांचा एकत्रित विचार करून ‘बुद्धिस्ट सर्किट’ तयार केले गेले तर याचा धार्मिक पर्यटनाच्या दृष्टीने मोठा उपयोग होईल. यामुळे पर्यटकांना या स्थळांपर्यंत सहज पोहचता येईल व यातून स्थानिकांना रोजगार मिळेल.

एम्ससाठी जमीन
नागपुरात एम्स स्थापन करण्यास केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. यासाठी आता राज्य सरकार जागा उपलब्ध करून देणार आहे. यामुळे प्रत्यक्षात एम्सच्या कामाला गती मिळेल. या प्रकल्पामुळे दर्जेदार आरोग्य सुविधा मिळतील व वैद्यकीय संशोधनास चालना मिळेल.
सीएम विथ कमिटमेंट
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मनात असलेली विदर्भ आणि नागपूरच्या विकासाची तळमळ आज क्षणोक्षणी जाणवत होती. फडणवीस विरोधी पक्षात असताना सातत्याने नागपूरच्या विकासाबाबत विविध कल्पना मांडायचे. मुख्यमंत्री झल्यावर ते विकासाबाबत विविध व्यासपीठावरून आश्वासन द्यायचे. परंतु एवढ्या अल्पावधीत या कल्याणकारी योजना वेगाने पुढे नेतील, असे विरोधकांनाही वाटले नव्हते. आज विधिमंडळ परिसरात विविध पक्षीय नेते व पत्रकारांमध्ये ‘सीएम विथ कमिटमेंट’ हीच सकारात्मक चर्चा होती.
काटोलचे संत्रा प्रक्रिया केंद्र सुरू करणार
काटोलमधील बंद संत्रा प्रक्रिया केंद्र पुन्हा सुरू केले जाईल. त्यासाठी न्यायालयाबाहेर तडजोडीसाठी सरकार पुढाकार घेईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. यामुळे काटोल, नरखेड, कळमेश्वर या भागातील संत्र्यावर प्रक्रिया केली जाईल. संत्रा उत्पादकांना संत्रा विक्रीसाठी व्यापाऱ्यांवर अवलंबून रहावे लागणार नाही. चांगले दर मिळतील.

टर्मिनल मार्केटचे काम वर्षभरात सुरू
नागपूर येथे टर्मिनल मार्केटसाठी १०० एकर जागा संपादित केली असून एक वर्षाच्या आत तेथे पीपीपी तत्त्वावर विकासक नेमून बांधकाम सुरू केले जाईल. यामुळे भविष्यात नागपूरच्या परिसरात व्यापारी उलाढालीला एक मोठे केंद्र उपलब्ध होईल. यातून शेतकऱ्याचा मालासाठी मोठी बाजारपेठ उपलब्ध होईल.

ट्रिपल आयटीसाठी जमीन
राज्य सरकार नागपुरात ट्रिपल आयटी व एम्ससाठी जमीन उपलब्ध करून देणार आहे. नागपुरात शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय नाही. ट्रिपल आयटीमुळे अभियांत्रिकी शिक्षणासाठी राष्ट्रीय स्तरावरील दर्जेदार संस्था उपलब्ध होईल. येथेच कुशल अभियंते तयार होणार असल्यामुळे कंपन्याही मिहानकडे आकर्षित होतील. रोजगाराच्या संधी वाढतील.

Web Title: Shining Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.