लोहमार्ग पोलिसांमुळे `ती` बचावली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:06 IST2021-06-27T04:06:51+5:302021-06-27T04:06:51+5:30
नागपूर : नागपूर रेल्वेस्थानकाच्या प्लॅफार्म क्रमांक एकवरील प्रतिक्षालयात एक १३ वर्षाची अल्पवयीन मुलगी भेदरलेल्या अवस्थेत बसली होती. बराच वेळ ...

लोहमार्ग पोलिसांमुळे `ती` बचावली
नागपूर : नागपूर रेल्वेस्थानकाच्या प्लॅफार्म क्रमांक एकवरील प्रतिक्षालयात एक १३ वर्षाची अल्पवयीन मुलगी भेदरलेल्या अवस्थेत बसली होती. बराच वेळ ती एकटीच बसल्यामुळे प्रतिक्षालयातील महिला कर्मचाऱ्याचे लक्ष तिच्याकडे गेले. चौकशी अंती ती घरून रागाने निघून आल्याचे समजले. लगेच लोहमार्ग महिला पोलीस प्रतिक्षालयात पोहोचल्या. त्यांनी या मुलीची आस्थेने चौकशी करून ती सुखरुप असल्याचा निरोप तिच्या आई-वडिलांना दिला. लोहमार्ग पोलिसांनी वेळीच कारवाई केल्यामुळे ही मुलगी असामाजिक तत्वांच्या हाती जाण्यापासून बचावली.
गीता (काल्पनिक नाव) असे त्या अल्पवयीन मुलीचे नाव आहे. ती बिलासपूर छत्तीसगडची रहिवासी आहे. तिला आईवडिल आणि चार बहिणी आहेत. ती आठव्या वर्गात शिकते. आजपर्यंत ती कधीच घराच्या बाहेर पडली नव्हती. अभ्यासावरून आईसोबत भांडण झाल्यामुळे तिने घर सोडण्याचा निर्णय घेतला. बिलासपूरवरून ती बसने नागपुरात आली. खासगी बसमधून उतरल्यानंतर ती पायीच नागपूर रेल्वेस्थानकावर पोहोचली. कदाचित तिच्याकडे नागपूरला येण्यापुरतेच पैसे असावेत. नागपूरवरून तिला पुण्याला जायचे होते. नागपूर रेल्वेस्थानकावर ती भेदरलेल्या अवस्थेत प्लॅटफार्म क्रमांक १ वरील प्रतिक्षालयात बसली होती. बराच वेळ ती बसून असल्यामुळे प्रतिक्षालयातील महिला कर्मचाऱ्याने लोहमार्ग पोलिसांना सूचना केली. लोहमार्ग महिला पोलीस वनिता खडसे, दीपाली आदींनी तिची आस्थेने विचारपूस केली. तिने घडलेला प्रकार महिला पोलिसांना सांगितला. त्यानंतर तिच्या आईवडिलांना ती सुखरुप असल्याची सूचना देण्यात आली. रेल्वे चाईल्ड लाईनच्या मदतीने या अल्पवयीन मुलीला वसतिगृहात पाठविण्यात आले. आईवडिल आल्यानंतर तिला त्यांच्या स्वाधीन करण्यात येणार असल्याची माहिती लोहमार्ग पोलिसांनी दिली.
.................