लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बलात्कार झाल्याची तक्रार करणारी एक मुलगी आरोपीसोबत एसटी बसने गावोगाव फिरली. दरम्यान, संधी मिळूनही तिने आरोपीने अपहरण व बलात्कार केल्याची माहिती कोणालाच दिली नाही. तसेच, तिचा आरोप सिद्ध करणारे ठोस पुरावे रेकॉर्डवर आढळून आले नाहीत. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने आरोपीला संशयाचा लाभ देऊन निर्दोष मुक्त केले.
न्यायमूर्ती उर्मिला जोशी-फलके यांनी हा निर्णय दिला. सुभाष देवनाथ भोवते (२५) असे आरोपीचे नाव असून तो किलेवाडा, ता. पवनी येथील रहिवासी आहे. घटनेच्या वेळी पीडित मुलगी १७वर्षे वयाची होती. आरोपीने लग्न करण्याचे वचन देऊन तिला २३ सप्टेंबर २०२१ रोजी पळवून एसटी बसने भंडारा येथे नेले. तेथून ते मांढळ व वेलतूर येथे गेले. दरम्यान, आरोपीने मुलीवर वारंवार बलात्कार केला, अशी तक्रार होती. ३ एप्रिल २०२३ रोजी सत्र न्यायालयाने आरोपीला बलात्कार व अपहरणाच्या गुन्ह्याकरिता दोषी ठरवून २० वर्षे सश्रम कारावासाची कमाल शिक्षा सुनावली होती.
त्या निर्णयाविरुद्ध आरोपीने उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. उच्च न्यायालयाने ठोस पुराव्यांअभावी ते अपील मंजूर करून सत्र न्यायालयाचा निर्णय रद्द केला. आरोपीतर्फे अॅड. महेश राय यांनी बाजू मांडली.