...अन् तिने प्रियकराऐवजी पालकांना दिले झुकते माप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 00:19 IST2021-01-02T00:17:58+5:302021-01-02T00:19:35+5:30
High court, Love story १९ वर्षीय प्रियकराने त्याच्या २७ वर्षीय प्रेयसीला पालकांच्या ताब्यातून बाहेर काढण्यासाठी आणि तिला सोबत घेऊन जाण्यासाठी मोठ्या आशेने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली होती. परंतु, प्रेयसीने प्रियकराऐवजी पालकांना झुकते माप देऊन त्यांच्यासोबतच जाणे व राहणे पसंत केले. ''अजब प्रेम की गजब कहाणी'' प्रकारात मोडणारे हे प्रकरण चर्चेचा विषय ठरले.

...अन् तिने प्रियकराऐवजी पालकांना दिले झुकते माप
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : १९ वर्षीय प्रियकराने त्याच्या २७ वर्षीय प्रेयसीला पालकांच्या ताब्यातून बाहेर काढण्यासाठी आणि तिला सोबत घेऊन जाण्यासाठी मोठ्या आशेने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली होती. परंतु, प्रेयसीने प्रियकराऐवजी पालकांना झुकते माप देऊन त्यांच्यासोबतच जाणे व राहणे पसंत केले. ''अजब प्रेम की गजब कहाणी'' प्रकारात मोडणारे हे प्रकरण चर्चेचा विषय ठरले.
अभिषेक बाबू असे प्रियकराचे नाव आहे. त्याची प्रेयसी कविता (बदललेले नाव) अभियांत्रिकी पदवीधारक असून सध्या ती बी. एड. पदवीचे शिक्षण घेत आहे. ती फेब्रुवारीपर्यंत महाविद्यालयात गेली. त्यानंतर लॉकडाऊन लागू झाल्यामुळे ती घरीच राहायला लागली. दरम्यान, नोव्हेंबरमध्ये कविता व अभिषेक पुणे येथे एकमेकांना भेटले. तेथे त्यांनी हॉटेलमध्ये मुक्काम केला. त्यानंतर ते नागपूरला येऊन पुन्हा एक रात्र हॉटेलमध्ये थांबले. दुसऱ्या दिवशी ते आपापल्या घरी निघून गेले. पुढे अभिषेकचा कवितासोबत संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे कविताला तिच्या पालकांनी अवैधरीत्या डांबून ठेवले असावे असा त्याचा समज झाला. परिणामी, त्याने उच्च न्यायालयात याचिका दाखल करून कविताला पालकांच्या ताब्यातून बाहेर काढण्याची विनंती केली. न्यायालयाच्या आदेशावरून पोलिसांनी कविताला न्यायालयात आणले. न्यायमूर्ती अनिल किलोर यांनी दोन महिला अधिकाऱ्यांमार्फत कविताची विचारपूस केली असता, तिने पालकांवरील आरोप अमान्य केले. पालकांनी बळजबरीने घरात डांबून ठेवले नाही अशी माहिती तिने दिली. कविताची आईदेखील न्यायालयात उपस्थित होती. तिने कविता अभिषेकसाेबत जाण्यास तयार असल्यास आक्षेप घेणार नाही अशी भूमिका मांडली. त्यानंतर कवितानेच अभिषेकऐवजी पालकांसोबत जाण्यास व राहण्यास पसंती दिली. त्यामुळे अभिषेकचा भ्रमनिरास झाला.