तिने फोन करून बोलविले, त्यांनी हत्या केली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:07 IST2021-05-30T04:07:44+5:302021-05-30T04:07:44+5:30
लष्करीबागेतील हत्याकांडात खुलासा : चारही आरोपी गजाआड लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : नात्यातील मुलीचे प्रेमसंबंध माहीत पडल्यामुळे आरोपींनी कपिल ...

तिने फोन करून बोलविले, त्यांनी हत्या केली
लष्करीबागेतील हत्याकांडात खुलासा : चारही आरोपी गजाआड
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नात्यातील मुलीचे प्रेमसंबंध माहीत पडल्यामुळे आरोपींनी कपिल श्रीकांत बैन (१८) याची हत्या केल्याचे उघड झाले आहे. दरम्यान, पाचपावली पोलिसांनी आरोपी उमेश रमेश चिकाटे (३४), स्वप्निल उर्फ गोलू बाबुराव चिकाटे (२७), अविनाश उर्फ कालू विजय सहारे (३३) आणि विवेक उर्फ भुऱ्या विजय सहारे (३०) यांना अटक केली आहे.
हे सर्व आरोपी लष्करीबाग परिसरातील तक्षशिला बुद्ध विहारच्या मागे राहतात. मृत कपिल मोतीबागमधील नोगा फॅक्टरी जवळ राहत होता. आरोपीच्या नात्यातील एका अल्पवयीन मुलीसोबत कपिलचे प्रेम संबंध होते. त्यामुळे तो तिला भेटायला यायचा. आरोपी चिकाटे आणि सहारे यांना ते माहीत पडले. त्यामुळे ते त्याचा काटा काढण्याची संधी शोधत होते. शुक्रवारी रात्री ७.४५ ला मुलीने कपिलला फोन करून भेटण्यासाठी बोलविले. त्यानुसार कपिल, त्याचा मित्र अब्दुल सलीम अब्दुल सत्तार याच्यासोबत ८.४५ च्या सुमारास प्रेयसीच्या घराजवळ पोहोचला. बाजूलाच ते खर्रा खात असताना कपिलच्या मागावर असलेले आरोपी उमेश, गोलू, कालू आणि भुऱ्या त्याच्याजवळ आले. तू इथे कशाला आला, अशी विचारणा करून त्याला मारहाण करू लागले. त्यामुळे कपिलचा मित्र सलीम तेथून बाजूला गेला. आरोपींनी कपिलच्या डोक्यावर विटा मारून त्याची निर्घृण हत्या केली आणि पळून गेले.
कपिलची हत्या झाल्याचे माहीत पडल्यामुळे मोतीबाग परिसरातील मोठ्या संख्येतील संतप्त जमाव घटनास्थळी आला. ते आरोपींना शोधू लागले. त्यामुळे परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला. माहिती कळताच पाचपावलीचा पोलीस ताफा, गुन्हे शाखेचे पथक तसेच पोलीस उपायुक्त लोहित मतानी घटनास्थळी पोहोचले. जमाव आक्रमक असल्याचे पाहून त्यांनी शीघ्र कृती दलाचे पथकही तेथे बोलावून घेतले. तणाव वाढल्यामुळे मोठा पोलीस बंदोबस्त आजूबाजूच्या परिसरात लावण्यात आला. संतप्त जमावाची कशीबशी समजूत काढून पोलिसांनी वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, रात्रभर शोधाशोध करून पोलिसांनी उमेश, कालू आणि भुऱ्या या तिघांना अटक केली. तर आज दुपारी स्वप्निल उर्फ गोलू चिकाटे यालाही अटक करण्यात आली.
---
मोबाईल मधून उलगडा
पोलिसांनी आरोपींना हत्येचे कारण विचारले असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. कपिलचा मोबाईल तपासला असता त्यात त्याच्या प्रेयसीचा त्याला फोन आला होता आणि त्यामुळे तो तिच्या भेटीला घटनास्थळी आला होता. त्यातूनच आरोपींनी त्याचा काटा काढल्याचे उघड झाले.
---