शरद पवारांनी दिवसभर केली पाहणी : ना थकले, ना थांबले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2019 07:00 AM2019-11-15T07:00:00+5:302019-11-15T07:00:06+5:30

७९ वय असलेल्या पवारांमध्ये एक तडफदार व उर्जावान तरुण दडलेला आहे. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी नागपुरात आलेल्या पवारांची ही बाजू अनुभवण्याची राष्ट्रवादी कॉंंग्रेससह नागपूर जिल्ह्यातील नागरिकांना गुरुवारी संधी मिळाली.

Sharad Pawar observes throughout the day: neither tired nor stopped | शरद पवारांनी दिवसभर केली पाहणी : ना थकले, ना थांबले

शरद पवारांनी दिवसभर केली पाहणी : ना थकले, ना थांबले

Next
ठळक मुद्दे७९ वर्षीय तरुणाची उर्जा पाहून कार्यकर्तेही भारावले

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शरद पवार...नाव घेतले की मुरब्बी राजकारणी, शेतकऱ्यांप्रति कळवळा असलेला नेता व राजकारणातील ‘जाणता राजा’ अशीच प्रतिमा डोळ््यासमोर येते. मात्र ७९ वय असलेल्या पवारांमध्ये एक तडफदार व उर्जावान तरुण दडलेला आहे. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी नागपुरात आलेल्या पवारांची ही बाजू अनुभवण्याची राष्ट्रवादी कॉंंग्रेससह नागपूर जिल्ह्यातील नागरिकांना गुरुवारी संधी मिळाली. जेवण वगळता इतर कुठेही विश्रांतीसाठी न थांबता, न थकता पवार यांनी नागपूर जिल्ह्याचा दौरा केला व शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यांची ही उर्जा पाहून वयाने तरुण असलेले कार्यकर्तेदेखील भारावून गेले.
राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली असून सत्तास्थापनेसंदर्भातील कोंडी फोडण्यासाठी कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस व शिवसेना या पक्षांच्या नेत्यांमध्ये बैठकी सुरू आहेत. अशा स्थितीतदेखील पवार यांनी दोन दिवसीय नागपूर दौºयावर यायचे निश्चित केले. सकाळी १० च्या सुमारास पवार यांचे डॉ.बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झाले. मात्र मुंबईतून पवार सकाळी सातच्या सुमारासच निवासस्थानाहून निघाले होते. नागपुरात आगमन झाल्यानंतर कुठलीही औपचारिकता न पाळत ते थेट शेतकºयांचे झालेले नुकसान पाहण्यासाठी थेट शेतांकडेच रवाना झाले. अगोदर काटोल, कामठी व दिवसाच्या शेवटी कुही मतदारसंघातील विविध गावांना त्यांनी दिवसभरात भेटी दिल्या. अतिवृष्टीमुळे नागपूर जिल्ह्यातील कापूस, संत्रा, धान, ऊसउत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. प्रत्येक ठिकाणी पवार स्वत: शेतीमध्ये जाऊन पीकांच्या नुकसानीबाबत शेतकऱ्यांना विचारणा करत होते व त्यांच्या भावना जाणून घेत होते. शेतकऱ्यांच्या डोळ््यात अक्षरश: अश्रू आले असताना पवार यांनी वडीलकीच्या भावनेतून त्यांच्या पाठीवरुन हातदेखील फिरविला. विशेष म्हणजे पवार येणार असल्याची माहिती झाल्यानंतर अनेक ठिकाणी ग्रामस्थ व शेतकरी त्यांची प्रतिक्षा करत रस्त्यांवर उभे होते. नियोजित वेळापत्रकात नसतानादेखील पवारांनी अशा सर्व नागरिकांशी गाडी थांबवून संवाद साधला. दुपारी एकच्या सुमारास केवळ २० मिनिटांसाठी काटोल येथे जेवणासाठी थांबा घेतला. त्यानंतर सायंकाळी उशीरापर्यंत त्यांचा दौरा अव्याहतपणे सुरू होता. चहापान, विश्रांतीसाठी त्यांनी कुठेही थांबा घेतला नाही हे विशेष.

माझे वय ३४ चेच
पवारांची उर्जा पाहून प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनीदेखील त्यांना यासंदर्भात प्रश्न केला. या वयातदेखील तुम्ही इतक्या उर्जेने शेतकऱ्यांना भेट आहात, हे तुम्हाला कसे जमते अशी त्यांना विचारणा झाली. तुम्ही पस्तिशीचे आहात व माझे वय तर ३४ चेच आहे. मी तुमच्यापेक्षा तरुणच आहे, या शब्दांत पवारांनी उत्तर दिले.

कृषी अधिकाऱ्यांना केली विचारणा
शेतकऱ्यांनी आपल्या भावना व्यक्त करत असताना कृषी खाते योग्य पद्धतीने सहकार्य करत नसल्याचे सांगितले. यावेळी पवारांनी तेथे उपस्थित असलेल्या कृषी अधिकाऱ्यांनादेखील विचारणा केली. अस्मानी संकटामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. अशा स्थितीत त्यांच्या समस्या तरी जाणून घ्या, असे पवार यांनी त्यांना सांगितले.

कार्यकर्ते थकले, पवार नाही
विधानसभा निवडणूकांच्या काळात राज्याने पवारांमधील उत्साह पाहिला होता. परंतु शेतकऱ्यांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी पवार त्याच उर्जेने फिरत असल्याचे पाहून कार्यकर्तेदेखील भारावून गेले. दुपारनंतर तर अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी थकले होते. पवारांसोबत गाड्यांचा मोठा ताफा होता. एखाद्या शेतजमिनीजवळ पवार थांबल्यावर काही पदाधिकारी-कार्यकर्ते गाड्यांतच बसून राहत होते. मात्र पवारांनी सर्वांशी गाडीतून उतरुनच संवाद साधला.

अनिल देशमुखांनी केले सारथ्य
शरद पवार नागपूर विमानतळावर दाखल झाल्यानंतर ‘व्हीव्हीआयपी’ गाडीमध्ये न बसता ते काटोलचे आमदार अनिल देशमुख यांच्या गाडीत बसले. विशेष म्हणजे गाडी स्वत: देशमुख हेच चालवत होते. संपूर्ण दौऱ्यातील बहुतांश वेळ देशमुख यांनीच गाडी चालविली व नियोजित वेळेत सर्व ठिकाणांपर्यंत पवार यांना नेऊन पिकांच्या झालेल्या नुकसानासंदर्भात इत्यंभूत माहिती दिली.

असा होता पवारांचा दौरा
सकाळी १० च्या सुमारास पवार नागपुरात पोहोचले. त्यानंतर थेट काटोलकडे निघाले. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे दत्तक गाव असलेल्या फेटरीमध्ये पवार यांचे गावकऱ्यांनी स्वागत केले व शेतकऱ्यांनी आपल्या समस्या मांडल्या. त्यानंतर चारगाव (शेतकरी : रवि पुनवटकर), हातला (शेतकरी :भय्याजी फिस्के), काटोल बायपास (शेतकरी : दिनकर वानखेडे), खानगाव (शेतकरी : रवी टेंभे), नायगाव ठाकरे (शेतकरी : प्रदीप ठाकरे), खापा (शेतकरी : यशवंद भादे), घोगरा (शेतकरी : धनराज दुधकवळे), महालगाव, लिहीगाव, तितूर या गावांचा दौरा केला. यावेळी त्यांच्यासमवेत माजी मंत्री आ. अनिल देशमुख, आ. प्रकाश गजभिये, आ.राजू पारवे, आ.ख्वाजा बेग, माजी मंत्री व कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक, माजी मंत्री रमेश बंग, माजी आमदार आशीष देशमुख, सलील देशमुख, प्रदेश उपाध्यक्ष डॉ.राजाभाऊ टांकसाळे, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष शैलेंद्र तिवारी प्रामुख्याने उपस्थित होते.

 

Web Title: Sharad Pawar observes throughout the day: neither tired nor stopped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.