निशांत वानखेडे, नागपूर: यावर्षी संपूर्ण राज्यात अकरावीचे प्रवेश केंद्रीय पद्धतीने करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार बुधवार २१ मे पासून विद्यार्थ्यांना ऑनलाईन नोंदणी करणे व पसंतीक्रम नोंदणीस सुरुवात होणार होती. मात्र, नोंदणीसाठी असलेले केंद्रीय प्रवेश समितीचे संकेतस्थळ सकाळपासून बंद पडल्याने पहिल्याच दिवशी अकरावी प्रवेश प्रक्रियेचा फज्जा उडाला. यामुळे अकरावी प्रवेशाच्या नोंदणीसाठी धावाधाव करणारे विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना मनस्ताप सहन करावा लागला.
केंद्रीय प्रवेश समितीच्या माध्यमातून महापालिका क्षेत्रातील शाळांमध्येच अकरावी प्रवेश ऑनलाईन माध्यमातून केले जात होते. मात्र, यावर्षीपासून सर्वच शाळांचे प्रवेश ऑनलाईन माध्यमातून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. ऑनलाईन प्रवेशामुळे विद्यार्थी काही शाळांनाच प्राधान्य देतात. त्याचा परिणाम अन्य शाळांच्या प्रवेशावर होतो, असा आक्षेप शिक्षण संस्था चालकांनी घेतला होता. राज्यात अकरावीच्या रिक्त जागांची संख्याही वाढली होती. परंतु, त्यानंतरही शासनाने यावर्षीपासून सर्वच शाळांचे अकरावी प्रवेश हे ऑनलाईन करण्याचा निर्णय घेतला. यासाठी १७ मे पर्यंत सर्व शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांची नोंदणीही संकेतस्थळावर करण्यात आली.
शहरातील १९० पेक्षा अधिक कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये ५५ हजार १५० जागांचा समावेश आहे. गेल्यावर्षी अकरावी प्रवेशासाठी तीन फेऱ्या, सहा विशेष फेऱ्या आणि आणखी दोन अतिरिक्त फेऱ्या घेण्यात आल्या होत्या. त्यामध्ये ३२ हजार ३२४ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता. याशिवाय २२ हजार ८२६ जागा रिक्त राहिल्या होत्या. यावर्षी संपूर्ण राज्यात ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबवण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला. त्यानुसार प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले.
दिवसभर गोंधळ१९ व २० मे दरम्यान विद्यार्थ्यांना नोंदणीचा सराव करण्यासाठी वेळ देण्यात आला होता. बुधवारपासून प्रत्यक्ष नोंदणी प्रक्रिया सुरू होणार होती. परंतु, संकेतस्थळ बंद असल्याने प्रवेश प्रक्रियेचा फज्जा उडाला आहे. विद्यार्थी दिलेल्या वेळेवर नोंदणीसाठी बसले होते. अनेक विद्यार्थी नोंदणीसाठी त्यांच्या शाळेत गेले होते. सुरुवातीपासूनच प्रवेश समितीचे संकेतस्थळ बंद पडले होते. विद्यार्थी व पालकांचे प्रयत्न दिवसभर सुरू होते. मात्र शेवटपर्यंत वेबसाईट सुरळीत झालीच नाही.