भाजप पदाधिकाऱ्यांवर ‘शाह इफेक्ट’
By Admin | Updated: June 2, 2017 02:23 IST2017-06-02T02:23:01+5:302017-06-02T02:23:01+5:30
लोकसभा निवडणुकीला दोन वर्षांचा कालावधी असला तरी भारतीय जनता पक्षाने संघटनात्मक पातळीवर तयारी सुरू केली आहे.

भाजप पदाधिकाऱ्यांवर ‘शाह इफेक्ट’
‘मिशन लोकसभा’चा आज शंखनाद :
दररोज २०० घरांपर्यंत पोहोचणार कार्यकर्ते
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लोकसभा निवडणुकीला दोन वर्षांचा कालावधी असला तरी भारतीय जनता पक्षाने संघटनात्मक पातळीवर तयारी सुरू केली आहे. बूथ विस्तारकांच्या माध्यमातून प्रत्येक घरापर्यंत संपर्क साधण्याची भाजपाची योजना आहे. भाजपाचे केंद्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या नागपूर भेटीनंतर शहर कार्यकारिणी पदाधिकाऱ्यांतर्फे या योजनेवर आणखी जास्त गंभीरतेने लक्ष देण्यात येत आहे. शुक्रवारपासून ‘बूथ विस्तारक’ योजनेची सुरुवात होणार असून प्रतिदिवशी कमीत कमी २०० घरांपर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे.
यासंदर्भात गुरुवारी दुपारी गणेशपेठ येथील भाजपाच्या शहर कार्यालयात विस्तारकांची बैठक बोलविण्यात आली. यावेळी शहराध्यक्ष आ.सुधाकर कोहळे व विदर्भाचे संघटनमंत्री उपेंद्र कोठेकर प्रामुख्याने उपस्थित होते. पंडित दीनदयाल उपाध्याय जन्मशताब्दी वषार्निमित्त शुक्रवारी सकाळी ७ वाजता शहरातील सर्व ३८ प्रभागांमध्ये या योजनेची सुरुवात होईल. या योजनेअंतर्गत खासदार, आमदार, राष्ट्रीय, प्रदेश, महानगर तसेच प्रभागांचे पदाधिकारी जनसंपर्क करतील व केंद्र तसेच राज्य शासनाच्या विविध योजनांची माहिती देतील. यावेळी आ.मिलिंद माने, महामंत्री संदीप जाधव, संघटनमंत्री भोजराज डुम्बे, प्रा.राजू हडप, विस्तारक योजना प्रमुख जयप्रकाश गुप्ता, दयाशंकर तिवारी उपस्थित होते. सोबतच महेंद्र राऊत, बंडू राऊत, किशन गावंडे, रमेश भंडारी, दिलीप गौर, विलास रहांगडाले, प्रशांत कामडी, संजय अवचट, श्याम चांदेकर, सतीश वडे, शिवनाथ पांडे, चंदन गोस्वामी हे पदाधिकारीदेखील उपस्थित होते. गेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपाला एकहाती यश मिळाले होते. नवीन प्रभागरचनेनुसार लढण्यात आलेल्या महानगरपालिका निवडणुकांत तर पक्षाला ‘रेकॉर्ड’ यश मिळाले. मात्र तरीदेखील पक्षाने कुठलाही धोका न पत्करता आतापासूनच संघटनात्मक बांधणी व जनसंपर्कावर भर देण्याचा संकल्प केला आहे. बूथ विस्तारक योजना ही भाजपाच्या ‘मिशन लोकसभा’चा शंखनादच मानण्यात येत आहे.
पदाधिकारी ‘दक्ष’
अमित शाह यांनी या आठवड्यात नागपूर भेटीत शहर पदाधिकाऱ्यांशी चर्चा करत बूथ विस्तारक योजनेसंदर्भात अनेक सूचना दिल्या होत्या. केंद्र-राज्याच्या योजनांचा जनतेत प्रचार-प्रसार करणे, पक्षाची भूमिका मांडणे याच्यासोबतच प्रचार साहित्याचे वाटप करणे, जुन्या कार्यकर्त्यांच्या भेटी घेणे व नवीन कार्यकर्ते जोडणे यावरदेखील या योजनेअंतर्गत भर द्यावा लागणार आहे. ही योजना गंभीरतेने घ्या व याचा अहवाल १५ तारखेपर्यंत सादर करा, असे शाह यांनी स्पष्ट केले होते. त्यामुळे पदाधिकारी डोळ्यात तेल टाकून या योजनेच्या अंमलबजावणीकडे लक्ष देत आहेत.