शाब्बास! नागपूर पोलीस

By Admin | Updated: October 13, 2016 03:54 IST2016-10-13T03:54:27+5:302016-10-13T03:54:27+5:30

सर्जिकल स्ट्राइकनंतर देशात निर्माण झालेली परिस्थिती देशाचे हृदयस्थळ असलेल्या नागपूरला वेगळी अनुभूती देणारी होती.

Shabbas! Nagpur Police | शाब्बास! नागपूर पोलीस

शाब्बास! नागपूर पोलीस

नागपूर : सर्जिकल स्ट्राइकनंतर देशात निर्माण झालेली परिस्थिती देशाचे हृदयस्थळ असलेल्या नागपूरला वेगळी अनुभूती देणारी होती. दहशतवादी संघटनांच्या हिटलिस्टवर असलेल्या नागपूरला सुरक्षा यंत्रणांकडून ‘जागते रहो’ अर्थात् सतर्कतेच्या सूचना मिळाल्या होत्या. दरम्यान, पवित्र दीक्षाभूमीवर समतेचे सोने लुटण्यासाठी लाखोंच्या संख्येत बौद्ध बांधव हजेरी लावणार होते. अशा परिस्थितीत शहर पोलिसांची ही अग्निपरीक्षाच होती. परंतु पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, सहपोलीस आयुक्त संतोष रस्तोगी, वाहतूक पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांचे योग्य नियोजन आणि पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे परिश्रम व सतर्कतेमुळे शहरात दसरा व धम्मचक्र प्रवर्तनाचा सोहळा शांततेत यशस्वीपणे पार पडला. पोलीसही या अग्निपरीक्षेत यशस्वी ठरले.
दरवर्षीच्या तुलनेत यंदा अधिकच चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पोलिसांनी दिवस तसेच रात्र अशा दोन पाळीत सातत्याने कर्तव्य पार पाडले. त्यासाठी १३०० पेक्षा जास्त अधिकारी आणि कर्मचारी (महिला-पुरुष) तैनात करण्यात आले होते.
पवित्र दीक्षाभूमीच्या आतबाहेर आणि चोहोबाजूने पोलीस बंदोबस्त होता. साध्या वेशातील जवानही गर्दीच्या आतबाहेर चौकस नजर ठेवून होते. मोठ्या प्रमाणात सीसीटीव्ही लावण्यात आले होत. दीक्षाभूमी परिसरातील बंदोबस्त हाताळण्यासाठी नियंत्रण कक्ष निर्माण करण्यात आले होते. गर्दीत हरविलेल्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांच्या विशेष पथकानेही मदत केली. कुणालाही, कसलीही अडचण असल्यास पोलीस तात्काळ मदत करायचे. नागरिकांना मार्गदर्शक सूचना देण्यासाठी विविध प्रकारचे फलक या भागात लावण्यात आले होते. पोलीस उपायुक्त दर्जाच्या पाच अधिकाऱ्यांच्या थेट निगराणीत बंदोबस्त ठेवण्यात आला होता, त्यावर पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम आणि सहपोलीस आयुक्त संतोष रस्तोगी यांची नजर होती. बारीकसारीक घडामोडींची माहिती सतत घेतली जात होती. . सर्वांना व्यवस्थित जाता-येता यावे, यासाठी विशिष्ट प्रकारची बॅरेकेटिंग करण्यात आली आहे. यासोबतच स्मार्तना पाटील यांनी वाहतूक व्यवस्थेचे यशस्वी नियोजन पार पाडले. त्यामुळे वाहतुकीला खोळंबा झाला नाही. १६ ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली होती. वाहनांची कोंडी न झाल्याने अनुयायांना सुद्धा व्यवस्थितपणे दीक्षाभूमीवर येता आले आणि बाहेर जाता आले. (प्रतिनिधी)

Web Title: Shabbas! Nagpur Police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.