अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार : दोन आरोपींना प्रत्येकी १० वर्षांचा कारावास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2019 22:41 IST2019-03-27T22:39:32+5:302019-03-27T22:41:01+5:30
विशेष सत्र न्यायालयाने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या दोन आरोपींना प्रत्येकी १० वर्षे सश्रम कारावास व दोन हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास ४ महिने अतिरिक्त कारावास अशी कमाल शिक्षा सुनावली. न्यायाधीश के. जी. राठी यांनी हा निर्णय दिला. ही घटना वेलतूर पोलीस ठाण्यांतर्गत घडली होती.

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार : दोन आरोपींना प्रत्येकी १० वर्षांचा कारावास
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विशेष सत्र न्यायालयाने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या दोन आरोपींना प्रत्येकी १० वर्षे सश्रम कारावास व दोन हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास ४ महिने अतिरिक्त कारावास अशी कमाल शिक्षा सुनावली. न्यायाधीश के. जी. राठी यांनी हा निर्णय दिला. ही घटना वेलतूर पोलीस ठाण्यांतर्गत घडली होती.
सुनील ऊर्फ सुमित प्रल्हाद रामटेके (२८) व रोहित ऊर्फ गोलू प्रभाकर बारसागडे (१९) अशी आरोपींची नावे असून ते फेकड येथील रहिवासी आहेत. पीडित मुलगीही याच गावातील आहे. ही घटना ५ ऑगस्ट २०१७ रोजी सायंकाळी ५ च्या सुमारास घडली होती. आरोपींनी मुलीवर लैंगिक अत्याचार केल्यानंतर याची माहिती कुणाला सांगितल्यास ठार मारू, अशी धमकी दिली. त्यावेळी मुलगी १३ वर्षे वयाची होती. तिने धाडस करून आजीला घटनेची माहिती दिली. त्यानंतर १० ऑगस्ट २०१७ रोजी आरोपींविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली. पोलिसांनी एफआयआर दाखल करून आरोपींना अटक केली. सहायक पोलीस निरीक्षक अविनाश उपासे यांनी प्रकरणाचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. न्यायालयात सरकारतर्फे अॅड. श्याम खुळे यांनी कामकाज पाहिले.