‘सेक्सटॉर्शन माफिया’ची नजर आता राजकीय नेत्यांवर.. सोशल मिडियावरून केली जाते मैत्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2021 20:13 IST2021-11-24T20:10:14+5:302021-11-24T20:13:53+5:30
Nagpur News मागील काही काळापासून अनेकांना ‘सेक्सटॉर्शन’मध्ये अडकविण्याचे प्रकार होत असून आता या ‘ई-माफियांनी त्यांचा मोर्चा चक्क राजकीय क्षेत्राकडे वळविला आहे.

‘सेक्सटॉर्शन माफिया’ची नजर आता राजकीय नेत्यांवर.. सोशल मिडियावरून केली जाते मैत्री
नागपूर : सबकुछ ऑनलाईनच्या युगात ‘सोशल मीडिया’चा वापर वाढला. सायबर गुन्हे वाढीस लागले आहेत. मागील काही काळापासून अनेकांना ‘सेक्सटॉर्शन’मध्ये अडकविण्याचे प्रकार होत असून आता या ‘ई-माफियांनी त्यांचा मोर्चा चक्क राजकीय क्षेत्राकडे वळविला आहे. मुंबईतील एका आमदारासोबत असा प्रकार घडल्यानंतर यंत्रणा सतर्क झाली आहे. निवडणुकांच्या कालावधीत याचा वापर करून विविध पदाधिकाऱी व कार्यकर्त्यांना टार्गेट करण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे.
महिला बोलत असल्याचे भासवत अश्लील व्हिडिओ कॉल करून शिवसेना आमदार मंगेश कुडाळकर यांना ‘सेक्सटॉर्शन’च्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न झाला. त्यांच्याकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाला मुंबई सायबर पोलिसांनी राजस्थान येथून अटक केली. परंतु या प्रकारामुळे राजकीय क्षेत्रावर असलेला संभाव्य धोका समोर आला आहे.
सेक्स्टॉर्शन म्हणजे नेमके काय?
नेत्यांशी एखाद्या कामानिमित्त भेटण्यासाठी टोळीतील सदस्य वेगवेगळ्या नावाने भेटून नेते व पदाधिकारी यांच्याशी जवळीक वाढवतात. मग फ्रेन्ड रिक्वेस्ट आदी पाठवून सोशल मीडियावर मैत्री केली जाते. नेत्यांना फॉलोअर्सची गरज असल्याने फ्रेन्ड रिक्वेस्ट पाठविणारा कोण आहे? काय करतो? याची माहिती न घेताच रिक्वेस्ट ॲक्सेप्ट करतात. पुरुष गुन्हेगारच बरेचदा व्हाईस मॉड्युलर सॉफ्टवेअर वापरून महिलांच्या आवाजात ऑडिओ कॉलवर संभाषण करतात, हेदेखील संबंधित प्रकरणावरून पुढे आले आहे. यासंदर्भात नेते व त्यांच्या ‘सोशल मीडिया’चमूने विशेष काळजी घेण्याची आवश्यकता असल्याची मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
नेत्यांनी सजग व्हावे
नेत्यांचा समाजात सहज वावर असतो. अनोळखी नागरिकही कामानिमित्त त्यांना भेटायला येतात. त्यामुळे ते सहज फोनवर, चॅटिंगवर उपलब्ध होतात. त्यामुळे आता नेतेमंडळींकडे सायबर गुन्हेगारांनी मोर्चा वळविला आहे. राजकीय स्पर्धेतूही असे प्रकार होऊ शकतात. त्यामुळे नेत्यांंनी ‘सोशल मीडिया’वर विशेष काळजी घेण्याची आवश्यकता असल्याचे मत ‘सोशल मीडिया’ तज्ज्ञ अजित पारसे यांनी व्यक्त केले आहे.