सोनेगाव पोलीस ठाण्यासमोर ‘सेक्स रॅकेट’
By Admin | Updated: July 5, 2015 03:01 IST2015-07-05T03:01:44+5:302015-07-05T03:01:44+5:30
सोनेगाव पोलीस ठाण्यासमोर हॉटेल मॅजेस्टिक मनोरा येथे सुरू असलेला देहव्यापाराचा अड्डा उघडकीस आला आहे.

सोनेगाव पोलीस ठाण्यासमोर ‘सेक्स रॅकेट’
तिघांना अटक-सूत्रधार फरार : एस्कार्ट सर्व्हिसद्वारे संचालित
नागपूर : सोनेगाव पोलीस ठाण्यासमोर हॉटेल मॅजेस्टिक मनोरा येथे सुरू असलेला देहव्यापाराचा अड्डा उघडकीस आला आहे. पोलीस ठाण्यासमोरच सुरू असलेला हा अड्डा उघडकीस आल्याने सोनेगाव पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. एस्कॉर्ट सर्व्हिसच्या माध्यमातून हा अड्डा चालविला जात होता. या अड्ड्याचा सूत्रधार फरार झाला असून हॉटेलचे व्यवस्थापक आणि महिलेसह तिघांना अटक करण्यात आली आहे. मॅनेजर प्रभुदास कांबळे (२६) रा. चंदननगर, शुभम बेडेकर (२५) रा. मस्कासाथ आणि नेहा श्रीवास (२६) रा. दिघोरी अशी आरोपीची नावे आहेत.
या टोळीचा सूत्रधार मुंबई येथे राहणारा संदेश मून ऊर्फ सन्नी आहे. सन्नी हा बबलू आणि एका महिलेच्या माध्यमातून ही टोळी चालवितो. ही टोळी एस्कॉर्ट सर्व्हिस चालवतात. सन्नीचा मोबाईल नंबर एस्कॉर्ट सर्व्हिसमध्ये नोंदविलेला आहे. या माध्यमातून डमी ग्राहकाने सन्नीशी संपर्क साधला. सन्नीचा विश्वास बसल्यावर त्याने आपल्या साथीदारांशी संपर्क करण्यास सांगितले. त्यानंतर ग्राहकाने नेहा आणि शुभमशी संपर्क साधला. त्यांनी ग्राहकाला अगोदर वर्धमाननगरला बोलाविले. तेथून काटोल नाका चौक आणि इंदोऱ्यात बोलाविले. इंदोऱ्यात ग्राहकाला तरुणी सोपविण्यात आली. यानंतर त्याला सोनेगाव पोलीस ठाण्यासमोरील हॉटेल मॅजेस्टिक मनोरा येथे जाण्यास सांगण्यात आले.
शुभमने ग्राहकाकडून दलालीचे दोन हजार रुपये आणि तरुणीचे ११०० रुपये घेतले. हॉटेलमध्ये पोहोचल्यावर मॅनेजर प्रभुदासने एक तासाचे दीड हजार रुपये घेऊन खोली दिली. ग्राहक तरुणीला घेऊन हॉटेलच्या खोलीत जाताच पोलिसांनी धाड टाकली. (प्रतिनिधी)