वनवेंवर शिक्कामोर्तब, काँग्रेसचे ‘स्वीकृत’ रखडले
By Admin | Updated: June 2, 2017 02:27 IST2017-06-02T02:27:36+5:302017-06-02T02:27:36+5:30
महापालिकेच्या सभागृहात गुरुवारी तानाजी वनवे यांची महापालिकेचे अधिकृत विरोधी पक्षनेते म्हणून घोषणा करण्यात आली.

वनवेंवर शिक्कामोर्तब, काँग्रेसचे ‘स्वीकृत’ रखडले
कायदेतज्ज्ञाचे मत घेऊन घेणार निर्णय : भाजपाच्या चार स्वीकृत सदस्यांची घोषणा
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापालिकेच्या सभागृहात गुरुवारी तानाजी वनवे यांची महापालिकेचे अधिकृत विरोधी पक्षनेते म्हणून घोषणा करण्यात आली. परंतु काँग्रेसमधील अंतर्गत वाद व संजय महाकाळकर यांनी उच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका यामुळे काँग्रेसच्या एकमेव स्वीकृत सदस्याच्या बाबतीत कुठलाही निर्णय घेण्यात आला नाही. तर भाजपाचे सुनील अग्रवाल, मुन्ना पोकुलवार, किशोर वानखेडे व निशांत गांधी यांची स्वीकृत सदस्य म्हणून निवड झाल्याची घोषणा करण्यात आली.
१५१ सदस्यांच्या मनपा सभागृहात भाजपाचे १०८ सदस्य आहेत. भाजपाचा वेटेज पॉर्इंट ३.५७ आहे. त्यामुळे भाजपाचे चार स्वीकृत सदस्य निवडल्या गेले. तर काँग्रेसच्या नगरसेवकांची संख्या २९ आहे. त्यांचा वेजेट पॉर्इंट ०.९६ आहे. त्यामुळे त्यांच्या पदरी एकच स्वीकृत सदस्य आला आहे. बसपाकडे १० नगरसेवक असल्यामुळे त्यांचा वेटेज पॉर्इंट केवळ ०.३३ आहे. त्यांच्या पदरात एकही स्वीकृत सदस्य येऊ शकला नाही.
भाजपाकडून चार उमेदवारी अर्ज सादर करण्यात आले होते. त्यामुळे त्यांच्या चारही सदस्यांची निवड बहुमताने झाल्याची घोषणा सभागृहात करण्यात आली. परंतु काँग्रेसकडून विकास ठाकरे व किशोर जिचकार यांचे उमेदवारी अर्ज भरण्यात आले होते. गटनेता व विरोधी पक्षनेता या पदांना घेऊन उच्च न्यायालायत सुनावणी सुरू आहे. त्यामुळे काँग्रेसच्या स्वीकृत सदस्याच्या बाबतीत सभागृहाने कायदेतज्ञाचा सल्ला घेऊन पुढचे पाऊल टाकण्याचा निर्णय घेतला आहे.
सभागृहाची कारवाई सुरू झाल्यानंतर पार्डीकर यांनी वनवे यांना विरोधी पक्षनेता बनविण्यात आल्याची घोषणा केली. त्यानंतर स्वीकृत सदस्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. निगम सचिव हरीश दुबे यांनी नियमांचे वाचन करताना पक्षाच्या वेटेज पॉर्इंटची माहिती दिली. त्याच आधारावर भाजपाचे चार व काँग्रेसच्या कोट्यातून एका स्वीकृत सदस्याची निवड करण्यात येईल, अशी माहिती दिली. परंतु विरोधी पक्षनेत्यासंदर्भात न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीमुळे काँग्रेसच्या स्वीकृत सदस्यांची घोषणा करता येऊ शकत नसल्याचे सांगितले.