सात महिन्यात उंचावला मेडिकलच्या प्रगतीचा आलेख

By Admin | Updated: April 24, 2015 02:19 IST2015-04-24T02:19:28+5:302015-04-24T02:19:28+5:30

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील अव्यवस्था व दुरवस्था याबाबत नेहमी चर्चा होत असते.

A seven-month increase in medical advancement | सात महिन्यात उंचावला मेडिकलच्या प्रगतीचा आलेख

सात महिन्यात उंचावला मेडिकलच्या प्रगतीचा आलेख

नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील अव्यवस्था व दुरवस्था याबाबत नेहमी चर्चा होत असते. परंतु याच अपुऱ्या संसाधनाच्या बळावर प्रभारी असतानाही डॉ. अभिमन्यू निसवाडे यांनी सात महिन्यात जे करून दाखविले ते अनेकांना तीन-चार वर्षातही जमले नाही. विशेषत: स्वच्छता, रुग्णसेवा, व कामकाजात शिस्त आणून त्यांनी एक वेगळा आदर्श घालून दिला. त्यांच्या या कामाच्या पावती म्हणूनच शासनाने त्यांना पदोन्नती देत मेडिकलच्या अधिष्ठातापदाची जबाबदारी सोपविल्याचे बोलले जात आहे. तसा फॅक्स गुरुवारी मेडिकलला प्राप्त झाला आहे.
शासनाच्या उदासीनतेचा फटका राज्यातील सर्वच शासकीय रुग्णालयांना बसत आहे. आहे त्या परिस्थितीतून मार्ग काढणे अनेकांना कठीण जात आहे. गेल्या दहा वर्षांपासून चतुर्थ कर्मचाऱ्यांची पदेच भरण्यात आली नसल्याने विशेषत: नागपूरच्या मेडिकलची सफाई व्यवस्था पूर्णत: कोलमडली होती. सप्टेंबर महिन्यात प्रभारी अधिष्ठाताची जबाबदारी डॉ. निसवाडे यांच्याकडे येताच त्यांनी स्वच्छतेला प्राधान्य दिले. परिणामी, रुग्णालयातील वॉर्डासह वऱ्हांडाही चकाचक झाला आहे. सफाईची समस्या मार्गी लागताच कामकाजात शिस्त आणण्यासाठी डॉक्टरांनी पांढरा कोट (अ‍ॅप्रॉन) घातलच पाहिजे, अशी सक्ती करीत अंमलबजावणी केली. जास्तीत जास्त रुग्णांना उपचार मिळावा, बाहेर गावावरून येणाऱ्या रुग्णांची सेवा घडावी यासाठी बाह्यरु ग्ण विभागाची (ओपीडी) वेळ एक तासाने वाढविण्याचा धाडसी निर्णयही घेतला. जखमी रुग्णांना तत्काळ उपचार मिळावायासाठी जुने अपघात विभागाला पुन्हा कार्यन्वित केले. दोन आकस्मिक विभाग असलेले राज्यात नागपूर मेडिकल पहिले आहे. वरिष्ठ डॉक्टरांची २४ तास सेवा कशी मिळेल याकडे ते आता लक्ष देऊन आहेत. महत्त्वाचे म्हणजे, राज्यात प्रथमच शासकीय रुग्णालयात ‘किडनी ट्रान्सप्लांट’ सुरू करण्यासाठी त्यांच्या प्रयत्नाला यश मिळाले आहे. सुपर स्पेशालिटी रुग्णालयात ही सेवा कार्यान्वित होत आहे. सात महिन्यांच्या कारकिर्दीत त्यांनी मेडिकलचे रूप पालटले आहे. म्हणूनच की काय त्यांच्याकडे कायमस्वरूपी अधिष्ठाता पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. डॉ. निसवाडे म्हणाले, सहकाऱ्यांच्या विश्वासाच्या भरवशावर हे शक्य झाले आहे. रुग्णसेवा ही ईश्वर सेवा मानूनच आतापर्यंत सेवा देत आलो आहे, पुढेही अशीच सेवा देण्याचा प्रयत्न राहणार आहे.(प्रतिनिधी)

Web Title: A seven-month increase in medical advancement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.