बँक खात्यातील सात लाख रुपयांचा अपहार
By Admin | Updated: October 11, 2016 03:27 IST2016-10-11T03:27:47+5:302016-10-11T03:27:47+5:30
एका अनिवासी भारतीयाच्या बँक बचत खात्यातून सात लाख सहा हजार रुपयांचा अपहार करण्यात आला

बँक खात्यातील सात लाख रुपयांचा अपहार
नागपूर : एका अनिवासी भारतीयाच्या बँक बचत खात्यातून सात लाख सहा हजार रुपयांचा अपहार करण्यात आला आहे. या रकमेची अज्ञात आरोपीने १२ आॅक्टोबर २०१५ रोजी उचल केली आहे. यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात रिट याचिका दाखल करण्यात आली आहे.न्यायालयाने याप्रकरणाच्या तपासावर असमाधान व्यक्त केले आहे. तपास अधिकाऱ्याला १४ आॅक्टोबरपर्यंत आवश्यक कारवाई करण्यास सांगण्यात आले आहे. अन्यथा त्यांना वरिष्ठ अधिकारी व प्रकरणाच्या रेकॉर्डसह न्यायालयात हजर होण्याचे निर्देश देण्यात येतील असे स्पष्ट करण्यात आले आहे. प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व अतुल चांदूरकर यांच्यासमक्ष नुकतीच सुनावणी झाली.
अब्दुल अझीम मलिक असे अनिवासी भारतीयाचे नाव आहे. ते सध्या सौदी अरेबिया येथे स्थायिक झाले आहेत. पूर्वी ते गिट्टीखदान येथे राहात होते. प्रकरणाच्या तपासात समाधानकारक प्रगती झाली नसल्यामुळे त्यांचे ज्येष्ठ बंधू अब्दुल गनी मलिक यांनी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. प्रकरणाची सीबीआयमार्फत चौकशी व आरोपींवर कायद्यानुसार कारवाई करण्याचे निर्देश देण्यात यावेत अशी विनंती त्यांनी न्यायालयाला केली आहे. याचिकाकर्त्यातर्फे अॅड. ए. एच. जमाल तर, शासनातर्फे अतिरिक्त अभियोक्ता नितीन रोडे यांनी बाजू मांडली.(प्रतिनिधी)