अपघातात सात ठार

By Admin | Updated: August 24, 2014 01:16 IST2014-08-24T01:16:30+5:302014-08-24T01:16:30+5:30

नागपूरकडे येणारी भरधाव मारुती व्हॅन उभ्या ट्रकवर आदळल्यामुळे झालेल्या भीषण अपघातात चार जणांचा घटनास्थळी तर, तिघांचा रुग्णालयात नेताना मृत्यू झाला.

Seven killed in accident | अपघातात सात ठार

अपघातात सात ठार

व्हॅन उभ्या ट्रकवर आदळली : दोन गंभीर जखमी
नागपूर : नागपूरकडे येणारी भरधाव मारुती व्हॅन उभ्या ट्रकवर आदळल्यामुळे झालेल्या भीषण अपघातात चार जणांचा घटनास्थळी तर, तिघांचा रुग्णालयात नेताना मृत्यू झाला. या अपघातात दोघे गंभीर जखमी झाले. आज रात्री ८ च्या सुमारास नागपूर - छिंदवाडा - भोपाळ राष्टीय महामार्गावर हा भीषण अपघात घडला. केळवद पोलीस ठाण्यापासून दोन किलोमीटर अंतरावर घटनास्थळ आहे. या अपघातामुळे महामार्गावरची वाहतूक ठप्प झाली होती.
शहर पोलीस दलात कार्यरत असलेल्या सुनील तिवारी यांच्या नात्यातील एकूण १० जण आज कारने जामसावळीला दर्शनासाठी गेले होते. तिकडून ते आज रात्री ८ च्या सुमारास नागपूरकडे परत येत होते. व्हॅनमध्ये तीन महिला, तीन पुरुष आणि चार मुल-मुली असे १० जण बसून होते. सातपुडा रिसोर्टजवळ अंधारात रस्त्याच्या कडेला एक ट्रक (एमच ४०/ वाय ३८२) उभा होता. कारचालकाचे त्याकडे लक्ष गेले नसावे. त्यामुळे भरधाव व्हॅन (एमएच ४०/ ए २२४८) या ट्रकवर आदळली. कारचा वेग एवढा जास्त होता की, ट्रकवर कार आदळल्यानंतर तिची पुरती मोडतोड झाली आणि कारमधील महिला पुरुष रस्त्यावर फेकले गेले. चौघांचा जागीच मृत्यू झाला तर, पाच जणांना गंभीर दुखापत झाली.
त्यांना रुग्णालयात नेले जात असताना त्यातील तिघांचा रस्त्यात मृत्यू झाला. शांती राधिकाप्रसाद तिवारी, आकांक्षा सुनील तिवारी, नागेश अविनाश त्रिपाठी, अर्चना गणेश मिश्रा, गणेश मिश्रा, रौनक गणेश मिश्रा आणि आशा शंकर मिश्रा अशी मृतांची नावे आहेत.गंभीर अवस्थेत दोघांना येथील मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले. वृत्त लिहिस्तोवर त्यांची नावे स्पष्ट होऊ शकली नाही.
तीन कुटुंबांवर आघात
या अपघाताने तिवारी, मिश्रा तसेच त्रिपाठी कुटुंबावर आघात झाला आहे. सुनील तिवारी यांचा परिवार गोरेवाडा, मिश्रा परिवार कामठी आणि त्रिपाठी पाचपावलीत रहिवासी होय. या तिन्ही कुटुंबांचे आप्तस्वकिय मोठ्या संख्येत मेडिकलमध्ये पोहचले. त्यांचा आक्रोश पाहावला जात नव्हता.
अक्षता सुखरूप
दहापैकी सात जणांचा बळी घेणाऱ्या आणि दोघांना अत्यवस्थ करणाऱ्या या भीषण अपघातातून एक चिमुकली मात्र आश्चर्यकारकरीत्या बचावली. तिचे नाव अक्षता तिवारी आहे. ४ ते ५ वर्षांची ही चिमुकली कारमध्ये सुखरूप राहिली. तिला कसलीही दुखापत झाली नाही, हे विशेष !

Web Title: Seven killed in accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.