सात आरोपींना जन्मठेपच
By Admin | Updated: May 26, 2014 00:56 IST2014-05-26T00:56:22+5:302014-05-26T00:56:22+5:30
इमामवाडा परिसराला थरारून सोडणार्या बाळू मंडपे हत्याकांडातील नऊपैकी सात कुख्यात आरोपींची जन्मठेपेची शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने कायम ठेवली आहे. दोन आरोपींना निर्दोष

सात आरोपींना जन्मठेपच
हायकोर्ट : इमामवाड्यातील थरारक बाळू मंडपे हत्याकांड नागपूर : इमामवाडा परिसराला थरारून सोडणार्या बाळू मंडपे हत्याकांडातील नऊपैकी सात कुख्यात आरोपींची जन्मठेपेची शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने कायम ठेवली आहे. दोन आरोपींना निर्दोष सोडण्यात आले आहेत. ही घटना २00९ मधील आहे. विनोद विनायक ठाकरे (३१), लाला ऊर्फ अनुराग प्रकाश आसरे (२८) रा. बडकस चौक, कुणाल रमेश तागडे (२८) रा. चंदननगर, राजपूत ऊर्फ नाबुट परीराम परतेकी (२८) रा. सीरसपेठ, सचिन काशिनाथ इंगळे (८५) रा. रघुजीनगर, अमित सुरेश गुजर (२९) रा. चंदननगर व शेखर ऊर्फ हसन्या भीमराव मेश्राम (२७) रा. चंदननगर अशी शिक्षा कायम ठेवण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. रमेश पांडुरंग काळे (३८) रा. सीरसपेठ व गज्या ऊर्फ गजानन ईश्वर शाहू (३0) रा. चंदननगर या आरोपींना सबळ पुरावा नसल्यामुळे निर्दोष सोडण्यात आले आहे. सत्येंद्र ऊर्फ बाळू यादवराव मंडपे असे मृताचे पूर्ण नाव आहे. नागपूर सत्र न्यायालयाने १३ जानेवारी २0११ रोजी सर्व ९ आरोपींना भादंविच्या कलम ३0२ व १२0-ब अंतर्गत जन्मठेप व ५000 रुपये दंड, तर कलम १४७ व १४८ अंतर्गत प्रत्येकी १ वर्ष कारावास व १000 रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली होती. याविरुद्ध आरोपींनी उच्च न्यायालयात अपील केले होते. न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व चंद्रकांत भडंग यांनी प्रकरणातील विविध बाबी लक्षात घेता सात आरोपींचे अपील फेटाळून सत्र न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला, तर दोन आरोपींचे अपील मंजूर करून त्यांना निर्दोष सोडले. फिर्यादी अरुण गणपत पोहणकरने इमामवाडा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, २२ जानेवारी २00९ रोजी रात्री ९.४५ च्या सुमारास पोहणकर, बाळू मंडपे, सुधांशू वरांडे, धर्मेंद्र यादव, राजू जोशी व केवीन सूर्यवंशी हे शाहू किराणा दुकानामागे बोलत उभे होते. दरम्यान, १0 ते १२ जण वेगवेगळ्या मोटरसायकलने तेथे आले. ते बाळूला अश्लील शिवीगाळ करायला लागले. यानंतर त्यांनी बाळूला तलवार, चाकू, खंजीर व फरसा अशा धारदार शस्त्रांनी हल्ला चढवून गंभीर जखमी केले. पोहणकरने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता त्यालाही जखमी करण्यात आले. पोहणकरने अन्य मित्रांच्या मदतीने बाळूूला मेडिकल रुग्णालयात भरती केले. डॉक्टरांनी बाळूला तपासून मृत घोषित केले. पोहनकरच्या बयानानुसार, घटनेच्या दोन दिवसांपूर्वी उमेश यादव व विनोद ठाकरे यांचे कडाक्याचे भांडण झाले होते. बाळूूने मध्यस्थी करून भांडण मिटविले होते. यामुळे आरोपींनी बाळूूचा काटा काढला. पोलिसांनी आरोपींना अटक केल्यानंतर त्यांच्या कबुलीजबाबावरून गुन्ह्यात वापरलेल्या मोटरसायकली व शस्त्रे जप्त केली. तपासानंतर न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. सत्र न्यायालयात सरकारी पक्षाने ११ साक्षीदार तपासून तपासाचा अहवाल सादर केला होता. उच्च न्यायालयात एपीपी व्ही. ए. ठाकरे यांनी शासनातर्फे कामकाज पाहिले.