निवृत्ती वेतन प्रकरणांचा निपटारा गतीने करा
By Admin | Updated: September 5, 2014 01:09 IST2014-09-05T01:09:07+5:302014-09-05T01:09:07+5:30
सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना त्यांच्या निवृत्ती वेतनाचा लाभ वेळेत मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे या प्रकरणांचा निपटारा कर्मचाऱ्यांनी गतीने करावा, असे आवाहन विभागीय आयुक्त अनुपकुमार यांनी केले.

निवृत्ती वेतन प्रकरणांचा निपटारा गतीने करा
आयुक्तांचे आवाहन: कर्मचाऱ्यांची कार्यशाळा
नागपूर: सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना त्यांच्या निवृत्ती वेतनाचा लाभ वेळेत मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे या प्रकरणांचा निपटारा कर्मचाऱ्यांनी गतीने करावा, असे आवाहन विभागीय आयुक्त अनुपकुमार यांनी केले.
महालेखापाल व कनिष्ठ कोषागार अधिकारी कार्यालयातर्फे देशपांडे सभागृहात कर्मचाऱ्यांसाठी कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. त्याचे उद््घाटन अनुपकुमार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. निवृत्ती वेतनाचे प्रकरण तयार करताना प्रस्तावात अनेक त्रुटी राहतात. त्यामुळे प्रकरणांना विलंब होतो. मूळ प्रस्तावच त्रुटी विरहित असावा यासाठी प्रयत्न करणे हा या कार्यशाळेचा उद्देश असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. कोषागार यंत्रणा सक्षम ठेवणे आणि कार्यालय प्रमुखांनी अशा प्रकरणांमध्ये जातीने लक्ष घालणे गरजेचे आहे, असे अनुपकुमार म्हणाले.
निवृत्ती वेतन ही कर्मचाऱ्यांच्या आयुष्याची पुंजी असते. ती त्याला निवृत्ती नंतर तत्काळ कशी मिळेल यादृष्टीने कर्मचाऱ्यांनी प्रयत्न करावा, असे महालेखापाल (लेखा आणि हकदारी) दिनेश पाटील म्हणाले. वरिष्ठ कोषागार अधिकारी मोना ठाकूर यांनी कार्यक्रमाची भूमिका विशद केली. कार्यक्रमाला उपमहालेखापाल डॉ. विशाल चवरे, साई गांधी यावेळी उपस्थित होते. (प्रतिनिधी)