प्रलंबित तक्रारींचा निपटारा करा
By Admin | Updated: April 4, 2017 02:04 IST2017-04-04T02:04:32+5:302017-04-04T02:04:32+5:30
जिल्हास्तरीय लोकशाही दिनात जनतेकडून दाखल होणाऱ्या तक्रारींसंदर्भात एक महिन्यात निर्णय घेऊन केलेल्या कार्यवाहीबाबत तक्रारदारांना कळविणे बंधनकारक आहे.

प्रलंबित तक्रारींचा निपटारा करा
लोकशाहीदिनात जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांचे आवाहन
नागपूर : जिल्हास्तरीय लोकशाही दिनात जनतेकडून दाखल होणाऱ्या तक्रारींसंदर्भात एक महिन्यात निर्णय घेऊन केलेल्या कार्यवाहीबाबत तक्रारदारांना कळविणे बंधनकारक आहे. विविध विभागप्रमुखांकडे प्रलंबित असलेल्या तक्रारींवर तत्काळ निर्णय घेऊन तक्रारदाराला केलेल्या कार्यवाहीबद्दल अवगत करा, अशा सूचना जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी सोमवारी दिल्या.
जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन छत्रपती सभागृहात करण्यात आले होते. यावेळी जिल्ह्यातील नागरिकांनी आपली गाऱ्हाणी व तक्रारी लोकशाही दिनात मांडली. निवासी उपजिल्हाधिकारी के.एन.के. राव यांनी तक्रारदारांचे म्हणणे ऐकून घेऊन संबंधित विभागांकडे पुढील कार्यवाहीसाठी तक्रारी सोपविल्या. या लोकशाही दिनात २० तक्रारी दाखल झाल्या आहेत. भूमिअभिलेख, महसूल तसेच सहकारी विभागासंदर्भात सर्वाधिक तक्रारी आजच्या लोकशाही दिनात दाखल झाल्या. यावेळी सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.(प्रतिनिधी)
विविध विभागात
१८४ तक्रारी प्रलंबित
विविध विभागांमध्ये १८४ तक्रारी प्रलंबित आहेत. यापैकी सार्वाधिक तक्रारी भूमिअभिलेख तसेच महसूल, शिक्षण, नगर प्रशासन, सहकार, नागपूर पाटबंधारे विभाग आदी विभागांशी संबंधित आहेत. या तक्रारीं संदर्भात चौकशी करून संबंधित तक्रारदाराला केलेल्या कार्यवाहीबद्दल लेखी स्वरूपात कळविण्यात यावे, अशा सूचना यावेळी देण्यात आल्या.
विभागीय लोकशाहीदिन
१० एप्रिल रोजी
विभागीय लोकशाहीदिन येत्या १० एप्रिल रोजी आयोजित करण्यात आला आहे. यावेळी विभागीय आयुक्त अनुप कुमार हे जनतेच्या तक्रारी व गाऱ्हाणी ऐकतील. तक्रारकर्त्यांनी जिल्हास्तरावरील लोकशाही दिनात दिलेल्या निवेदनाची प्रत, लोकशाही दिनाच्या टोकनाची प्रत तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मिळालेल्या उत्तराची प्रत या सर्व प्रतींचे स्वतंत्र दोन संच घेऊन सकाळी ११ ते दुपारी १ वाजेपर्यंत स्वत: उपस्थित राहावे.