नागपूर : आशा आणि गटप्रवर्तकांच्या मागण्यांवर निर्णय झाल्याने आणि सरकारने मानधनात वाढ करण्याचा निर्णय घेतल्याने नागपुरात सुरू असलेला आशा व गटप्रवर्तकांचा संप मिटला आहे. संविधान चौकातील या संपस्थळी आता गुरुवारी विजयी सभा घेतली जाणार आहे.
मानधन आणि अन्य मागण्यांच्या संदर्भात जिल्ह्यातील आशा आणि गटप्रवर्तकांचे आंदोलन सुरू होते. येथील संविधान चौकात शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत आयटकचे नेते श्याम काळे यांच्या नेतृत्वात तसेच मंगला लोखडे, मंगला पांडे, मंदा डोगरे, संगिता गौतम, संगिता फलके, ज्योती रक्षित, वर्षा चिखले, सोनु कुकसे, शितल बालपांडे, उषा लोखंडे आदींच्या पुढाकारात हे आंदोलन मागील ९ दिवसांपासून सुरू होते.
मुंबईत राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी मंत्रालयात महाराष्ट्र आशा व गटप्रवर्तक कर्मचारी कृती समितीसोबत चर्चा केली. तडजोडीनुसार, आशा कार्यकर्त्यांना दीड हजार आणि गटप्रवर्तकांना १,७०० रुपयांचे मानधन १ जुलैपासून वाढवून मिळणार आहे. माहिती संकलन व सादरीकरण कामांसाठी आशांना दरमहा एक हजार व व गटप्रवर्तकांना १,२०० रुपये निश्चित व कायमस्वरूपी वाढ आणि ५०० रुपये कोविड प्रोत्साहन भत्ता मिळणार आहे. पुढील वर्षीपासून ५०० रुपयांची निश्चित वाढ यासह अनेक निर्णय झाले आहेत. या लढ्याला आलेल्या यशाबद्दल गुरुवारी विजयी सभा होणार आहे. ...
कोट
आशा कार्यकर्त्या आणि गटप्रवर्तकांच्या महत्वाच्या मागण्यांवर झालेला निर्णय हे सामूहिक लढ्याचे यश आहे. मानधनामध्ये वाढ करून राज्य सरकारने दिलासादायक निर्णय घेतला आहे. तो तातडीने अमलात आणावा.
- श्याम काळे, आयटक नेते
...