संक्रांतीला तीळ-गुळाचे दर वाढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 04:07 IST2020-12-27T04:07:36+5:302020-12-27T04:07:36+5:30

नागपूर : देशांतर्गत तिळाच्या उत्पादनात ५० टक्के घट झाल्यामुळे यंदा तीळ आणि मकरसंक्रांतीला तीळगूळ महागणार आहे. सध्या आवक ...

Sesame-jaggery prices will go up during Sankranti | संक्रांतीला तीळ-गुळाचे दर वाढणार

संक्रांतीला तीळ-गुळाचे दर वाढणार

नागपूर : देशांतर्गत तिळाच्या उत्पादनात ५० टक्के घट झाल्यामुळे यंदा तीळ आणि मकरसंक्रांतीला तीळगूळ महागणार आहे. सध्या आवक कमी आहे. सध्या बाजारपेठेत मागणी कमी असल्याने दर स्थिर आहेत, पण मागणी वाढताच दरवाढ होण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली.

गेल्या काही दिवसांपूर्वी नवीन तिळाची आवक कमी असल्याने व्यापाऱ्यांनी जुन्या तिळाची विक्री सुरू केली. त्यामुळे प्रारंभी भाव ५ ते १० रुपये किलोने वाढले होते. पण नवीन तिळाची आवक वाढताच भाव पुन्हा कमी होऊन घाऊक बाजारात मध्यम दर्जाचे तीळ ११० रुपये किलो आणि उत्तम दर्जाचे १४० रुपये किलोपर्यंत उतरले. तर गेल्यावर्षी १७५ रुपयांपर्यंत गेलेले लाल तिळाचे दर यंदा १३५ रुपयांवर आहेत. सध्या इतवारी व मस्कासाथ बाजारात आतापर्यंत ६ हजार पोते (१ पोते ५० किलो) तीळ बाजारात आले आहेत. पुढे आवक वाढणार आहे. कोरोनामुळे सध्या ग्राहकी कमी आहे. पण संक्रांत जवळ येताच मागणी वाढल्यानंतर भाव वाढतील. भाव वाढण्याचे दुसरे कारण म्हणजे गुजरात सरकारने निर्यातीसाठी ६१ हजार मेट्रिक टनांची निविदा काढली आहे. त्यामुळे तेथून मालाची जावक वाढल्यानंतर भाव १० रुपयांपर्यंत वाढू शकतात, असे मत इतवारीतील नीरव ट्रेडिंगचे संचालक अरविंद पटेल यांनी व्यक्त केले.

पटेल म्हणाले, पांढऱ्या तिळाची विक्री संपूर्ण देशात होते. त्या तुलनेत लाल तिळाची विक्री केवळ महाराष्ट्रात होते. नागपूर संक्रांतीला केवळ लाल तिळाची मागणी असते. त्यामुळे लाल तिळाचे दर पांढऱ्याच्या तुलनेत जास्त असतात. गेल्यावर्षी संक्रांतीच्या दोन दिवसांपूर्वी लाल तीळ १९० रुपयांवर पोहोचले होते.

देशातंर्गत तिळाच्या उत्पादनाची स्थिती

भारतात पांढऱ्या तिळाचे उत्पादन राजस्थान (उंझा) आणि मध्य प्रदेशात (ग्वाल्हेर) येथे तर लाल तीळ गुजरातमध्ये (राजकोट) जास्त प्रमाणात होते. देशांतर्गत तिळाची गरज साडेचार लाख मेट्रिक टन इतकी आहे. गेल्यावर्षी देशात सुमारे १ लाख ७७ हजार मेट्रिक टन उत्पादन झाले होते. यंदाही त्यात फारशी वाढ होण्याचे संकेत नाहीत. याशिवाय उन्हाळी तिळाचे उत्पादन साधारण ७५ हजार मेट्रिक टन राहण्याचा अंदाज आहे. भारतासह चीन, पाकिस्तान, कोरिया, सुदान, युगांडा, इथोपिया, टांझानिया, नायजेरिया आदी आफ्रिकन देशांमध्ये तिळाचे उत्पादन घेतले जाते. इथोपिया आणि नायजेरिया देशातून भारतात आयातदारांनी सुमारे दीड लाख मेट्रिक टन तिळाची आयात करण्याची प्रक्रिया पूर्ण केल्याची माहिती आहे. त्यामुळे देशात तिळाचा पुरवठा आणि मागणी सुरळीत होणार असल्याचे पटेल यांनी स्पष्ट केले.

सध्या महागाईने उच्चांक गाठला असून सर्वच वस्तू महाग झाल्या आहेत. तीळ आणि गुळाचे भाव कितीही वाढले तरीही संक्रांत सण साजरा करणार आहोतच. संक्रांतीची खरेदी दोन वा तीन दिवसांपूर्वी होते. तेव्हा असतील त्या भावातच खरेदी करावी लागेल. सध्या महागाईने महिन्याचे बजेट वाढले आहे.

ज्योती पत्की, गृहिणी.

व्यापाऱ्यांनी तीळ विक्रीसाठी बोलविले आहेत, पण कोरोनामुळे ग्राहकी कमी आहे. यंदा माल येण्यास उशीर झाल्याने किरकोळ व्यापाऱ्यांनी जुन्याच मालाची विक्री सुरू केली. नवीन मालाची आवक सुरू झाल्यानंतर भाव उतरले आहेत. पण संक्रांतीपूर्वी भाववाढीची शक्यता आहे.

अरविंद पटेल, व्यापारी.

घाऊक व किरकोळ बाजारात तिळाचे भाव

तीळ घाऊककिरकोळ

पांढरे (उत्तम) १२५ १५०

पांढरे (मध्यम) ११० १३५

पांढरे (पॅकिंग) १२५ १५०

लाल १३५ १६५

लाल (पॅकिंग) १४५ १७०

गुळाचे भाव

गेल्या काही दिवसांपूर्वी वाढलेले गुळाचे (लड्डू) भाव कमी झाले असून किरकोळमध्ये ४० रुपये किलो आहेत. कोल्हापुरी गूळ (केमिकलयुक्त) ५५ ते ६० रुपये आणि देशी गूळ (केमिकलरहित) ६५ रुपये किलो आहे. संक्रांतीत मागणीनंतर भाव वाढू शकतात, असे व्यापारी चंदू जैन म्हणाले.

साखरेचे भाव

यावर्षी बंपर उत्पादनामुळे देशांतर्गत स्थानिक बाजारात गेल्या काही दिवसात साखरेचे भाव कमी झाले आहेत. काही दिवसांपूर्वी किरकोळ बाजारात ३८ रुपये किलोवर गेलेले भाव आता ३४ ते ३५ रुपयांपर्यंत उतरले आहेत. मागणीच्या तुलनेत पुरवठा जास्त असल्याने पुढे भाव कमी होण्याची शक्यता आहे.

Web Title: Sesame-jaggery prices will go up during Sankranti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.