समता सैनिक दलाचे सेवाव्रत
By Admin | Updated: October 5, 2014 00:58 IST2014-10-05T00:58:18+5:302014-10-05T00:58:18+5:30
लाखोंच्या निळ्या गर्दीने दीक्षाभूमी ओसंडून वाहत होती. हातात निळे झेंडे आणि मुखात डॉ. बाबासाहेबांचा जयजयकाराने हा अख्खा परिसर दुमदुमत होता. देशभरातून येणाऱ्या अनुयायांचा प्रचंड उत्साह

समता सैनिक दलाचे सेवाव्रत
नागपूर : लाखोंच्या निळ्या गर्दीने दीक्षाभूमी ओसंडून वाहत होती. हातात निळे झेंडे आणि मुखात डॉ. बाबासाहेबांचा जयजयकाराने हा अख्खा परिसर दुमदुमत होता. देशभरातून येणाऱ्या अनुयायांचा प्रचंड उत्साह आणि ऊर्जा प्रत्येक जण अनुभवत असताना कुठेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून समता सैनिक दलाचे तब्बल दोन हजार स्वयंसेवक डोळ्यात तेल घालून होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या समता सैनिक दलाचे हे स्वयंसेवक विदर्भासह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आले होते. निळी टोपी, पांढरा शर्ट, खाकी पँट आणि हातात काठी घेऊन हे स्वयंसेवक सलग तीन दिवस जागोजागी मदतीसाठी उभी होते.
दलाचे प्रदीप डोंगरे यांनी सांगितले, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून स्वयंस्फूर्तीने हे स्वयंसेवक येतात. यात महिलांची उपस्थिती लक्षणीय असते. धम्मचक्र प्रवर्तनदिनाच्या दोन दिवसांपूर्वी या सर्वांना मार्गदर्शन केले जाते. प्रत्येकाला कामाची माहिती व त्यांचे स्थळ ठरवून दिले जाते. दीक्षाभूमीवर येणारा प्रत्येक अनुयायी हा आमचा बांधव आहे. यामुळे त्यांच्याशी बोलताना, माहिती देताना एकप्रकारची आत्मीयता असते. यामुळेच अनेक तरुण या दलाशी दरवर्षी जुळतात. दीक्षाभूमीवर सुरक्षा देण्यासोबतच व्यसन करणाऱ्या युवकांना मार्गदर्शनही केले जाते. यासाठी एक वेगळी चमू कार्यरत असते.
आतापर्यंत आम्ही शेकडो युवकांंना व्यसनातून बाहेर काढले आहे. बाबासाहेबांनी आमच्यावर ही मोठी जबाबदारी दिली आहे. यात जर सर्वांनी एकत्र येऊन एका सूत्रबद्ध पद्धतीने व निष्ठापूर्वक रीतीने वाटचाल करण्याचा निर्धार केला तर खऱ्या अर्थाने बाबासाहेबांचे ‘भारत बौद्धमय’ करण्याचे स्वप्न काहीअंशी साकार झाल्याशिवाय राहणार नाही, असेही ते म्हणाले.