सेवा करणाऱ्याने नम्र राहावे
By Admin | Updated: November 8, 2014 02:46 IST2014-11-08T02:46:38+5:302014-11-08T02:46:38+5:30
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्य प्रेम व जिव्हाळ्यावर उभे आहे. प्रेमातूनच खरी सेवा घडते. त्यामुळे अहंकार, लोभ या भावना दूर ठेवून सेवा करणाऱ्याने नेहमी नम्र राहावे, ...

सेवा करणाऱ्याने नम्र राहावे
नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्य प्रेम व जिव्हाळ्यावर उभे आहे. प्रेमातूनच खरी सेवा घडते. त्यामुळे अहंकार, लोभ या भावना दूर ठेवून सेवा करणाऱ्याने नेहमी नम्र राहावे, या शब्दांत सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनी संघ परिवारातील सदस्यांना सल्ला दिला. अप्रत्यक्षपणे त्यांचा रोख संघ परिवाराशी जुळलेल्या राजकारण्यांकडे होता. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पश्चिम क्षेत्राचे माजी कार्यवाह विलास फडणवीस यांच्या प्रथम स्मृतिदिनी आयोजित ‘जिव्हाळा’ पुरस्कार वितरणप्रसंगी ते बोलत होते. लक्ष्मीनगर येथील सायंटिफिक सोसायटीच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात वंचित घटकांतील मुलामुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणणाऱ्या वसुंधरा चॅरिटेबल सोसायटीचा या पुरस्काराने सन्मान करण्यात आला.
समाजातील जिव्हाळा कमी होत आहे, अशी ओरड होते. परंतु संघात मात्र तो टिकून आहे. संघात असलेला जिव्हाळा समाजातील लोकांना जाणवावा यासाठी असंख्य स्वयंसेवक झटत आहेत. विलासजींच्या बोलण्यापासून ते त्यांच्या प्रत्येक कृतीत हा जिव्हाळा भरभरून जाणवायचा. हृद्यातील प्रेम ते शब्दांत ओतायचे. त्यांच्या याच स्वभावामुळे असंख्य लोक त्यांच्याशी मनापासून जुळले व समाजाला प्रेरणा देऊन गेले. विलासजींच्या अनेक आठवणी आजही ताज्या आहेत. व्यक्ती जाते, पण त्यांच्या प्रेमाचा सुगंध कायम राहतो, या शब्दांत सरसंघचालकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
वसुंधरा चॅरिटेबल सोसायटीचे नागेश पाटील यांनी यावेळी त्यांच्या संस्थेच्या कार्याविषयी माहिती दिली. विदर्भातील दुर्गम भागातील मुलामुलींना शिक्षण देण्याचे कार्य ही संस्था करते. सद्यस्थितीत या संस्थेतर्फे २८ मुली व २० मुलांच्या शिक्षणाचा खर्च उचलण्यात येत आहे. यावेळी मैथिली वालदे व राणी वाळके या विद्यार्थिनींनी ‘आई’वर कविता सादर करून उपस्थितांची दाद मिळवली.
अविनाश संगवई यांनी या पुरस्काराची रुपरेषा मांडली. समाजातील दुर्बल घटकांसाठी शैक्षणिक किंवा तत्सम क्षेत्रात काम करणाऱ्या सेवाभावी संस्थेला दरवर्षी २१ हजार रुपयांचा पुरस्कार देण्यात येणार आहे ही माहिती त्यांनी दिली. या पुरस्कार सोहळ्यानंतर ‘येथे कर माझे जुळती’ हा सुरेल गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मृणाल नाईक यांनी संचालन केले. (प्रतिनिधी)