लसीकरणासाठी पीएचसी, उपकेंद्रामध्ये राहणार स्वतंत्र व्यवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:05 IST2021-01-09T04:05:43+5:302021-01-09T04:05:43+5:30
नागपूर : नागपूर जिल्हा परिषदेनेही लसीकरणाची व्यवस्था केली असून, जि.प.च्या अखत्यारित येणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्र (पीएचसी), उपकेंद्रामध्ये ग्रामीण नागरिकांना ...

लसीकरणासाठी पीएचसी, उपकेंद्रामध्ये राहणार स्वतंत्र व्यवस्था
नागपूर : नागपूर जिल्हा परिषदेनेही लसीकरणाची व्यवस्था केली असून, जि.प.च्या अखत्यारित येणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्र (पीएचसी), उपकेंद्रामध्ये ग्रामीण नागरिकांना लसीकरणासाठी एक स्वतंत्र यंत्रणाच उभारण्यात येणार आहे.
यासंदर्भात उपाध्यक्ष व आरोग्य सभापती मनोहर कुंभारे यांनी सांगितले की, नुकत्याच पार पडलेल्या आरोग्य समितीच्या बैठकीमध्ये जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर व इतर आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांकडून लसीकरणाबाबत माहिती जाणून घेतली. कोरोनामुळे आजवर नागपूर जिल्ह्यात १ लाख २६ हजारावर बाधित आढळून आले आहेत. तर १ लाख १८ हजारावर लोकांनी कोरोनावर यशस्वीरित्या मातही केली आहे. तर ३९८४ जणांचा दुर्दैवी मृत्यूही झाला आहे. नागपूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये आजवर २५३६४ वर बाधित रुग्ण आढळून आले आहे. भारतातील संशोधकांनी प्रतिबंधात्मक लस शोधून काढल्याने जिल्हा परिषद प्रशासन तयारीला लागले आहे. जि.प.च्या अखत्यारित येणाऱ्या ४९ पीएचसी व ३१६ उपकेंद्रामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीकरण होणार आहे. त्यानंतर सामान्य नागरिकांना या लसीचा डोस देण्यात येणार आहे. त्याकरीता पीएचसी व उपकेंद्रामध्ये ३ स्वतंत्र रुम (कक्ष) या लसीकरणासाठी राखीव ठेवल्या जाणार आहे. त्यामध्ये एक रुम ही लसीकरणासाठी, एक रुम लस दिलेल्या व्यक्तीला कुठले साईड इफेक्ट किंवा भूरळ येऊ नये याकरिता काही वेळ थांबण्यासाठी व एक रुम ही लसीकरणासाठी आलेल्या व्यक्तींचे नाव नोंदणी व इतर कागदपत्रांच्या पूर्ततेकरिता राखीव ठेवल्या जाणार आहे.
- खनिज निधीतून रुग्णवाहिका
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाला खणिज अंतर्गत ७.६१ कोटीवरचा निधी प्राप्त झाला आहे. आजवर या निधीतून ग्रामीण भागामध्ये कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनासाठी खर्च करण्यात आला आहे. आता विभागाकडे जवळपास १.२५ कोटीवरचा निधी शिल्लक आहे. या शिल्लक निधीतून ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था अधिक सुदृढ होण्यासाठी रुग्णवाहिका खरेदी करण्यात येणार आहे.