नागपूर : लोहमार्ग पोलिसांचे बॉम्बशोधक व नाशक पथक द्वितीय श्रेणी प्रतीक्षागृहात पोहोचले. त्यांनी वेटिंग रूममधील प्रवाशांना बाहेर काढले. बॉम्बसदृश वस्तू असल्याची सूचना मिळाल्यामुळे त्यांनी शोधमोहीम सुरू केली. तब्बल अर्धा तास वेटिंग रूमचा कानाकोपरा पिंजून काढल्यानंतर काहीच आढळून आले नाही. अखेरीस सुरक्षेच्या दृष्टीने घेतलेली ही रंगीत तालीम असल्याची बाब कळाल्यानंतर प्रवाशांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. नागपूर रेल्वेस्थानकावर लोहमार्ग पोलीस ठाण्यातील पोलीस नायक उत्तम वाघमारे ड्युटीवर असताना द्वितीय श्रेणीच्या वेटिंग रुममध्ये बॉम्बसदृश वस्तू असल्याची बाब त्याच्या लक्षात आली. त्यांनी त्वरित लोहमार्ग पोलीस ठाण्यात दूरध्वनीवरून याबाबत माहिती दिली. लगेच लोहमार्ग पोलीस ठाण्याचे निरीक्षक अभय पान्हेकर, प्रवीण राठोड आणि पोलिसांनी घटनास्थळ गाठले. त्यांनी याबाबतची सूचना लोहमार्ग पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला आणि रेल्वे सुरक्षा दलाच्या नियंत्रण कक्षाला दिली. १५ मिनिटात लोहमार्ग पोलिसांचे बॉम्बशोधक व नाशक पथक घटनास्थळी हजर झाले. या पथकातील पोलिसांनी वेटींग रुममधील प्रवाशांना बाहेर काढले. त्यानंतर श्वानपथक आणि हँड मेटल डिटेक्टरच्या साह्याने पथकाने पिंजून काढला. (प्रतिनिधी)
वेटिंग रूममध्ये बॉम्बच्या अफवेमुळे खळबळ
By admin | Updated: April 12, 2015 02:23 IST