ज्येष्ठांना नकोय मिनी महापौरपद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:08 IST2021-02-15T04:08:28+5:302021-02-15T04:08:28+5:30

उद्या ऑनलाईन निवडणूक प्रक्रिया : लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : मिनी महापौर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महापालिकेच्या झोन ...

Seniors don't want mini mayorship | ज्येष्ठांना नकोय मिनी महापौरपद

ज्येष्ठांना नकोय मिनी महापौरपद

उद्या ऑनलाईन निवडणूक प्रक्रिया :

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : मिनी महापौर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महापालिकेच्या झोन सभापतींची निवडणूक उद्या मंगळवारी होत आहे. सर्व दहा झोनची निवडणूक ही एकाच दिवशी पार पडणार आहे. मात्र मनपाची बिकट आर्थिक स्थिती व काम करण्यासाठी आठ महिन्याचाच मिळणारा कालावधी यामुळे सभापती पदासाठी ज्येष्ठ नगरसेवक इच्छुक नसल्याचे पुढे आले आहे. यामुळे सत्तापक्षाची चिंता वाढली आहे.

२०२२ मध्ये मनपा निवडणूक आहे. अखेरचे वर्ष असल्यामुळे या पदावर राहूनही प्रभागातील विकास कामे झाली नाही तर मतदारांपुढे कसे जाणार, असा प्रश्न आहे. मनपात भाजपची एकहाती सत्ता आहे. महापालिकेच्या १५२ सदस्यांपैकी १०८ सदस्य हे भारतीय जनता पक्षाचे आहेत. सुरुवातीला सभापती पदासाठी इच्छुकांची संख्या मोठी होती. मात्र विकास कामासाठी निधी मिळत नसल्याने सभापतिपदाचा उपयोग काय, असा प्रश्न या नगरसेवकांना पडला आहे.

महापालिकेच्या एकूण दहापैकी आठ झोनमध्ये भाजपचा सभासपती निश्चित आहे. तर आशीनगर बसपा तर मंगळवारी झोन येथे काँग्रेसचे सभापती आहेत. मात्र मागील चार वर्षात चोप्रा या काँग्रेसच्या कुठल्याही कार्यक्रमात गेलेल्या नसल्याने त्या भाजपच्याच सदस्य असल्याचे मानल्या जात आहे. त्यामुळे, मंगळवारी झोनकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

.....

स्थायी समिती सदस्यांची निवड लांबली

येत्या १ मार्च रोजी स्थायी समिती अध्यक्ष विजय झलके यांचा कार्यकाळ संपत आहे. सोबतच समितीच्या १६ पैकी ८ सदस्य निवृत्त होणार आहेत. या जागेवर आठ नव्या सदस्यांची नियुक्ती करण्यात येईल. १८ फेब्रुवारी रोजी महापालिकेच्या महासभेत आठ सदस्यांचा प्रस्ताव येणे अपेक्षित होते. मात्र अंतर्गत वादामुळे अजेंड्यावर हा विषय आला नसल्याची माहिती आहे.

Web Title: Seniors don't want mini mayorship