लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मनपाच्या झोन सभापतीपदाला मिनी महापौर म्हणून पाहिले जाते. त्यामुळे हे पद मिळविण्यासाठी नगरसेवक इच्छुक असतात. परंतु यावेळी बहुतांश वरिष्ठ नगरसेवक हे पद घेण्यास इच्छुक नाहीत. कारण कोरोनामुळे वर्षभरापासून विकासकामे ठप्प पडली आहेत. येणाऱ्या वर्षात मनपाच्या निवडणुका आहेत. विकास कामांचा जुना अनुशेष दूर झालेला नाही. अशा परिस्थितीत नवीन विकासकामे मोठ्या मुश्किलीने सुरु होतील. सभापती बनल्यावर पूर्ण झोनची जबाबदारी राहील. काम न झाल्यास नागरिक मत देण्यास मागेपुढे पाहतील.
सभापतीपदाच्या निवडणुकीसाठी १५ फेब्रुवारी रोजी सकाळी १० ते दुपारी १.३० वाजेपर्यंत झोन आधारावर नामांकन (अर्ज)
करायचे आहे. नगर विकास विभागाच्या आदेशानुसार जिल्हाधिकाऱ्यांना पीठासीन अधिकारी बनवण्यात येईल. १६ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजेपासून झोन आधारावर ऑनलाईन निवडणूक होईल. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगने निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण केली जाईल. प्रत्येक झोनला १५ मिनिटांचा वेळ दिला जाणार आहे. आसीनगर झोन सोडून उर्वरित ८ झोनमध्ये भाजपचेच उमेदवार व समर्थित निवडून आले आहेत. मंगळवारी झोनमध्ये काँग्रेसच्या गार्गी चोपडाला भाजपने समर्थन दिले होते. तर आसीनगर झोनमध्ये बसपाच्या विरंका भिवगडे सभापती आहेत.
भाजपचे एका वरिष्ठ नगरसेवकाने सांगितले की, निवडणुकीच्या वर्षात झोन सभापतीकडून नागरिकांसोबतच नगरसेवकांच्याही अपेक्षा वाढतात. परंतु सध्या ज्या पद्धतीने मनपा प्रशासन आर्थिक तंगीचे कारण सांगून विकास कामे तर सोडा चेंबर आणि गटर लाईनचे कामही करीत नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये असंतोष पसरू लागला आहे. येणाऱ्या निवडणुकीमध्ये याचा परिणाम निश्चित पडेल.