ज्येष्ठ विदर्भवादी हरपला

By Admin | Updated: November 6, 2014 02:41 IST2014-11-06T02:41:35+5:302014-11-06T02:41:35+5:30

ज्येष्ठ स्वातंत्र्य संग्राम सैनिक, कट्टर विदर्भवादी व माजी मंत्री काँग्रेस नेते शंकरराव गेडाम यांचे बुधवारी दीर्घ आजाराने निधन झाले.

Senior Vedavbhavadi Harpal | ज्येष्ठ विदर्भवादी हरपला

ज्येष्ठ विदर्भवादी हरपला

नागपूर : ज्येष्ठ स्वातंत्र्य संग्राम सैनिक, कट्टर विदर्भवादी व माजी मंत्री काँग्रेस नेते शंकरराव गेडाम यांचे बुधवारी दीर्घ आजाराने निधन झाले. ते ९५ वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली आणि बराच मोठा आप्तपरिवार आहे. गुरुवारी दुपारी १२ वाजता त्यांची अंत्ययात्रा गिरीपेठ येथील निवासस्थानाहून निघणार असून अंबाझरी स्मशानभूमीवर अंत्यसंस्कार करण्यात येतील.
स्वातंत्रपूर्व व स्वातंत्र्योत्तर कालखंडाचे साक्षीदार असणारे शंकरराव गेडाम ज्येष्ठ गांधीवादी म्हणूनही परिचित होते. सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात त्यांचे भरीव योगदान राहिले आहे. काटोल तालुक्यातील थाटूरवाडा येथील एका शेतकरी कुटुंबात ७ सप्टेबर १९१९ या वर्षी त्यांचा जन्म झाला. विद्यार्थी दशेपासूनच त्यांचा स्वातंत्र्य चळवळीत सहभाग होता.
वकिलीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर ते काँग्रेसमध्ये सक्रिय झाले. १९५२, १९५७, १९६२ आणि १९७२ असे एकूण चार वेळा काटोल विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते. १९७५-७६ दरम्यान वसंतराव नाईक यांच्या तर १९७७-७८ या दरम्यान वसंतदादा पाटील यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी अनुक्रमे अन्न व नागरी पुरवठा आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून काम केले. राजकारणात विविध पदांवर काम करताना त्यांची समाजाशी असलेली नाळ कधीही तुटली नाही. आचार्य विनोबा भावे, बापूजी अणे, आचार्य दादा धर्माधिकारी, इंदिरा गांधी, यशवंतराव चव्हाण, दादासाहेब कन्नमवार, वसंतराव नाईक, वसंतदादा पाटील, शरद पवार आदी दिग्गज नेत्यांसोबत काम करण्याची संधी गेडाम यांना मिळाली होती.

Web Title: Senior Vedavbhavadi Harpal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.