ज्येष्ठ शास्त्रीय गायक डॉ. बाळ पुरोहित यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 04:07 IST2020-12-27T04:07:18+5:302020-12-27T04:07:18+5:30
नागपूर : नागपुरातील ज्येष्ठ शास्त्रीय गायक बाळासाहेब उपाख्य डॉ. नारायण भास्कर पुरोहित यांचे निधन झाले. ते ८९ वर्षाचे होते. ...

ज्येष्ठ शास्त्रीय गायक डॉ. बाळ पुरोहित यांचे निधन
नागपूर : नागपुरातील ज्येष्ठ शास्त्रीय गायक बाळासाहेब उपाख्य डॉ. नारायण भास्कर पुरोहित यांचे निधन झाले. ते ८९ वर्षाचे होते. त्यांच्यावर अंबाझरी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात दोन मुले असा परिवार आहे.
शास्त्रीय संगीतातील ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची ओळख होती. संगीत क्षेत्रात त्यांचे बहुमूल्य योगदान राहिले आहे. संगीताचे गाढे अभ्यासक, उत्कृष्ट गायक व लेखक म्हणून त्यांचे नाव देशभरात आदरपूर्वक घेतले जाते. ‘हिंदुस्थानी संगीत पद्धती : मूलतत्त्वे आणि सिद्धांत’ हे पुस्तक व विविध विषयांवर त्यांचे लेखन संगीत क्षेत्राला मार्गदर्शक ठरले आहे. ‘रसरंग’ या नावाने त्यांनी रचलेल्या बंदिशी आवर्जून गायल्या जातात. नागपूरच्या वसंतराव नाईक (मॉरिस) कॉलेज येथे त्यांनी प्राध्यापक म्हणून अध्यापनाचे कार्य केले. ते आकाशवाणीचे मान्यताप्राप्त गायक होते. त्यांना मुंबईच्या सूरसिंगार संसदने प्रतिष्ठेच्या ‘सूरमयी’ या पुरस्काराने सन्मानित केले होते. नागपुरातील विविध सांस्कृतिक संस्थांशी त्यांचा सक्रिय संबंध होता. त्यात ‘स्वरमंडळ’ या विदर्भ साहित्य संघाच्या संगीत संस्थेचा आवर्जून उल्लेख करता येईल. ‘संगीत तानारीरी’ या नाटकात त्यांनी संगीत दिग्दर्शक म्हणून जबाबदारी पेलली होती व त्यात भूमिकाही साकारली होती. उस्ताद अमीर खाँ यांच्या इंदूर घराण्याचा गायकीचा त्यांच्यावर विशेष प्रभाव होता.
* ऋषितुल्य संगीतज्ञ गमावला - अमित देशमुख
बाळासाहेबांच्या निधनाने शास्त्रीय संगीत क्षेत्रातील एक ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व आपण गमावल्याची शोकसंवेदना राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी व्यक्त केली आहे.
......