रेल्वेत पुन्हा मिळणार ज्येष्ठ नागरिकांना तिकिटाची सवलत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2023 20:34 IST2023-06-26T20:33:35+5:302023-06-26T20:34:01+5:30
Nagpur News कोरोना काळात बंद करण्यात आलेली ज्येष्ठ नागरिकांची तिकीट सवलत त्यांना पुन्हा बहाल केली जाऊ शकते. या संबंधाने अभ्यास समितीने रेल्वे बोर्डाला तशी शिफारस केल्यामुळे सवलतीबाबत उच्च पातळीवर चर्चा सुरू असल्याचे समजते.

रेल्वेत पुन्हा मिळणार ज्येष्ठ नागरिकांना तिकिटाची सवलत
नागपूर : कोरोना काळात बंद करण्यात आलेली ज्येष्ठ नागरिकांची तिकीट सवलत त्यांना पुन्हा बहाल केली जाऊ शकते. या संबंधाने अभ्यास समितीने रेल्वे बोर्डाला तशी शिफारस केल्यामुळे सवलतीबाबत उच्च पातळीवर चर्चा सुरू असल्याचे समजते.
कोरोनाचे संकट येण्यापूर्वी ज्येष्ठ नागरिकांना (सिनियर सिटीजन्स) रेल्वे प्रवास भाड्यात ५० टक्के सूट (सवलत) मिळत होती. कोरोना काळात प्रादुर्भावाच्या धोक्यामुळे रेल्वेगाड्या बंद करण्यात आल्या. त्यानंतर अनेक निर्बंध आणि बदल करून या गाड्या सुरू झाल्या. अनेकांच्या सवलतीही बंद करण्यात आल्या. नंतर निर्बंध हटविण्यात आले, मात्र बंद करण्यात आलेल्या अनेक सवलती सुरूच झाल्या नाही. ज्येष्ठ नागरिकांना प्रवास भाड्यात देण्यात येत असलेली ५० टक्क्यांची सूटही बंदच करण्यात आली. ही सवलत पुन्हा सुरू करण्यात यावी म्हणून देशभरात ठिकठिकाणाहून रेल्वे मंत्रालयाचे लक्ष वेधण्यात आले. लेखी-अर्ज विनंत्याही झाल्या. परंतु रेल्वेला कोट्यवधींचा तोटा असल्याचे कारण सांगून सवलत नाकारण्यात आली. दरम्यान, या संबंधाने कोट्यवधी ज्येष्ठ नागरिक नाराज असल्याचा सूर उमटल्याने एक अभ्यास समिती निर्माण करण्यात आली होती. या समितीने ज्येष्ठ नागरिकांना पुन्हा ५० टक्के प्रवास भाड्याची सवलत लागू करावी, अशी सूचना केल्याचे समजते. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना प्रवास भाड्यात पुन्हा सवलत लागू होण्याचे संकेत मिळाले आहे. मात्र, या माहितीला कोणत्याही अधिकाऱ्यांकडून अधिकृत दुजोरा दिलेला नाही. असे होऊ शकते, असे मात्र अधिकारी सांगतात.
कुणाला किती टक्के ?
रेल्वेच्या सूत्रांनुसार, रेल्वेत आधी ६० वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्या पुरुषांना तिकीट भाड्यात ४० टक्के, तर ५८ वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या महिलांना ५० टक्के प्रवास भाड्याची सवलत मिळत होती.
----