कोतवालीतील तरुणीची मध्य प्रदेशात विक्री ?
By Admin | Updated: May 15, 2014 02:27 IST2014-05-15T02:27:22+5:302014-05-15T02:27:22+5:30
८० हजारांच्या खंडणीसाठी येथील एका तरुणीला भोपाळमध्ये डांबून ठेवण्यात आले.

कोतवालीतील तरुणीची मध्य प्रदेशात विक्री ?
भोपाळमध्ये डांबले : ८० हजारांची मागणी
नागपूर :
८० हजारांच्या खंडणीसाठी येथील एका तरुणीला भोपाळमध्ये डांबून ठेवण्यात आले. शैलजा चौधरी (वय २२) असे पीडित तरुणीचे नाव असून, ती कोतवालीत राहाते. ओळखीच्या व्यक्तींनी तिची मध्य प्रदेशात ८० हजारात विक्री केल्याचा संशय आहे. या घटनेमुळे परिसरात चर्चेला उधाण आले आहे. अंजली नामक महिला, गौरव आणि रुपसिंग ऊर्फ मजबूतसिंग या तिघांनी शैलजाला कॅटरिंगच्या कामावर जास्त पैसे मिळणार, असे सांगून २१ एप्रिलला भोपाळला नेले.
तीन चार दिवस शैलजाचे घरच्यांना काम संपल्यावर परत येते, असे फोन यायचे. नंतर मात्र, मला येथे डांबून ठेवण्यात आले आहे. ८० हजार रुपये दिल्याशिवाय ‘ही मंडळी‘ मुक्त करणार नाही, असा फोन शैलजाने तिच्या नातेवाईकांना केला. यामुळे शैलजाची बहीण अभिलाषा रोशन शेंदरनिकर (वय २४, रा़ अयाचित मंदिर जवळ, नागपूर) यांनी कोतवाली पोलिसांकडे नोंदवली. पोलिसांनी अंजली, गौरव आणि रुपसिंगविरुद्ध अपहरण आणि खंडणीचा गुन्हा दाखल केला. आरोपींचा शोध घेतला जात आहे. (प्रतिनिधी)