सेल्फीच्या नादात जीव गेला
By Admin | Updated: November 16, 2016 02:33 IST2016-11-16T02:33:38+5:302016-11-16T02:33:38+5:30
स्थानिक गडमंदिर परिसरात राम झरोक्यातून सेल्फी काढत असताना तरुणाचा तोल गेला आणि तो खाली कोसळला

सेल्फीच्या नादात जीव गेला
तरुणाचा मृत्यू : रामटेकच्या गडमंदिर परिसरातील घटना
रामटेक : स्थानिक गडमंदिर परिसरात राम झरोक्यातून सेल्फी काढत असताना तरुणाचा तोल गेला आणि तो खाली कोसळला. त्यात डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा रुग्णालयात नेताना वाटेतच मृत्यू झाला. ही घटना सोमवारी मध्यरात्री १२.३० वाजताच्या सुमारास घडली. गडमंदिरावरील त्रिपूर पौर्णिमा उत्सवादरम्यान अपघाती मृत्यू होण्याची ही पहिलीच घटना असल्याची माहिती जाणकार नागरिकांनी दिली.
मनोज कल्याणराव भुते (२५, रा. भगवाननगर, नागपूर) असे मृत तरुणाचे नाव आहे. रामटेक येथे रविवारपासून (दि. १३) त्रिपूर पौर्णिमा उत्सवाचे आयोजन केले होते. या उत्सवादरम्यान सोमवारी (दि. १४) मध्यरात्री १२ वाजता गडमंदिरावर त्रिपूर जाळण्यात आला.
मनोज या उत्सवाचा आनंद घेण्यासाठी रामटेकला आला होता. त्रिपूर जाळण्यात आल्यानंतर तो रात्री गडमंदिर परिसरातील राम झरोक्यातून सेल्फी काढत असताना त्याचा तोल गेला आणि तो १५ फूट उंचीवरून खाली कोसळला. त्यात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने लगेच रामटेक येथील उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. तिथे प्रथमोपचार केल्यानंतर त्याला नागपूर येथील मेडिकल हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले.
तिथे डॉक्टरांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले. याप्रकरणी रामटेक पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.(शहर प्रतिनिधी)