मृत शेतकऱ्यांच्या नावावर उचलले बियाणे

By Admin | Updated: March 17, 2017 03:12 IST2017-03-17T03:12:26+5:302017-03-17T03:12:26+5:30

राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत कामठी तालुक्यातील लोणखैरी, नांदा, खापा (पाटण) व चिकना गावातील

Seeds picked up in the name of dead farmers | मृत शेतकऱ्यांच्या नावावर उचलले बियाणे

मृत शेतकऱ्यांच्या नावावर उचलले बियाणे

राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानाची कामठी तालुक्यात पोलखोल : जि.प.च्या कृषी समितीत गाजला मुद्दा
नागपूर : राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत कामठी तालुक्यातील लोणखैरी, नांदा, खापा (पाटण) व चिकना गावातील ५०० शेतकऱ्यांसाठी १४,००० किलो बियाणे आले होते. यातील ९५ टक्के शेतकऱ्यांच्या खोट्या सह्या करून कृषी अधिकाऱ्यांनी शासनाचे हरभरा बियाणे शेतकऱ्यांना मिळाल्याचे दाखवीत बियाण्यांची परस्पर विक्री केल्याचा प्रकार घडला आहे. विशेष म्हणजे यात मृत शेतकऱ्यांचादेखील लाभार्थ्यांच्या यादीत समावेश असून, त्यांची सही व बियाणे उचलल्याचे दाखविले आहे. यासंदर्भात जि.प.च्या कृषी समितीत सदस्य नाना कंभाले यांनी हा मुद्दा उचलून धरत, या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे.
जि.प.च्या कृषी समितीची सभा सभापती आशा गायकवाड यांच्या अध्यक्षतेत संपन्न झाली. सभेत नाना कंभाले यांनी लाभार्थ्यांच्या यादीसह बियाणे वाटपात झालेला घोळ लक्षात आणून दिला. यासंदर्भात कृषी सभापती आशा गायकवाड यांनी सभेनंतर स्वत: परिसराचा दौरा केला. तसेच कृषी समितीच्या सदस्यांनी जिल्हा कृषी अधीक्षकांना यासंदर्भात कारवाई करण्याची मागणी केली. त्याचबरोबर सभेत कुही तालुक्यातील पीक विमा योजनेंतर्गत वाटप करण्यात आलेल्या रकमेत तफावत असल्याचे सदस्य उपासराव भुते यांनी निदर्शनास आणून दिले. कुही तालुक्यातील मांढळ, वेलतूर, तितूर या भागात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पीक विम्याचे हेक्टरी ११०० रुपये तर कुही, राजोला व साळवा येथील शेतकऱ्यांना पीक विम्याचे ५,२०० रुपये नुकसान भरपाई मिळाली.
एकाच तालुक्यात सारखेच पीक आणि सारखेच नुकसान झाले असताना नुकसान भरपाई मिळण्यात तफावत का? असा सवाल भुते यांनी केला.
यासंदर्भात चौकशी करून सर्वांना समान पीक विम्याचे वाटप करण्याची मागणी भुते यांनी केली. त्याचबरोबर कृषी विभागांतर्गत देण्यात येणारे साहित्य निकृष्ट दर्जाचे असल्यामुळे शेतकऱ्यांकडून त्याची उचल होत नसल्याचे सदस्यांनी निदर्शनास आणुन दिले. जे साहित्य कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना पुरविले जात आहे ते साहित्य सबसिडीच्या रकमेत बाजारपेठेत उपलब्ध असल्याचे सदस्यांनी कृषी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले.
यासंदर्भातही चौकशीची मागणी करून, चौकशी होईपर्यंत पुरवठादारांचे बिल थांबविण्याची मागणी सदस्यांनी केली. सभेला सदस्य शिवकुमार यादव, मनोज तितरमारे, विनोद पाटील, कमलाकर मेंघर आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Seeds picked up in the name of dead farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.