दर आठवड्यात पहा सीताबर्डीचा किल्ला
By Admin | Updated: November 8, 2015 02:58 IST2015-11-08T02:58:19+5:302015-11-08T02:58:19+5:30
सीताबर्डीचा किल्ला नागपूरकरांना पहायचा असल्यास १५ आॅगस्ट किंवा २६ जानेवारीची वाट पहावी लागते.

दर आठवड्यात पहा सीताबर्डीचा किल्ला
संरक्षण मंत्र्यांचे गडकरींना पत्र :
महापौर प्रवीण दटके यांची माहिती
नागपूर : सीताबर्डीचा किल्ला नागपूरकरांना पहायचा असल्यास १५ आॅगस्ट किंवा २६ जानेवारीची वाट पहावी लागते. आता मात्र, नागपूरकरांना आठवड्यातून एकदा किल्ला पाहण्याची संधी मिळणार आहे.
संरक्षण मंत्रालयाने त्यासाठी तयारी दर्शविली असून संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांचे या संदर्भातील संमती दर्शविणारे पत्र केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांना प्राप्त झाले आहे, अशी माहिती महापौर प्रवीण दटके यांनी दिली.
नागपूर श्रमिक पत्रकार संघातर्फे टिळक पत्रकार भवनात शनिवारी आयोजित वार्तालाप कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी महापौर दटके म्हणाले, नागनदीची स्वच्छता व सौंदर्यीकरणासाठीही फ्रान्स, चीन व जपान या देशांकडून कर्ज मिळवून देण्यासाठी मदत करण्याची तयारी पर्यावरण मंत्रालयाने दर्शविली आहे. पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याकडूनही या संबधीचे पत्र केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना प्राप्त झाले असल्याचे त्यांनी सांगितले. शहरातील पर्यटन स्थळांचा विकास करण्यावर भर दिला जाणार असून फुटाळा, अंबाझरी या दोन्ही तलावांवर लाईट अॅण्ड साऊंड शो सुरू केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.(प्रतिनिधी)
मनपासाठी हवे विशेष पोलीस ठाणे
अतिक्रमण, मोकाट जनावरे सोडणाऱ्यांवर कारवाई, एलबीटी धाडी याशिवाय अनेक प्रकरणांमध्ये महापालिकेला पोलिसांच्या मदतीची गरज भासते. बऱ्याचदा वेळेवर पोलिसांकडून पुरेशी मदत मिळत नाही. त्यामुळे महापालिकेशी संबंधित प्रश्न हाताळण्यासाठी एक विशेष पोलीस ठाणे असावे, अशी मागणी राज्य सरकारकडे करण्यात आली आहे. संबंधित पोलीस ठाण्यात असलेल्या कर्मचाऱ्यांचे पगार महापालिका देईल, पोलीस ठाण्यासाठी जागा महापालिका उपलब्ध करून देईल, अशी तयारीही राज्य सरकारकडे दर्शविण्यात आली आहे. लवकरच राज्य सरकार यावर निर्णय घेईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
३२४ कोटींचे सिमेंट रस्ते
नागपूर शहरातील रस्ते येत्या काळात गुळगुळीत झालेले दिसतील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारानंतर महापालिकेने सिमेंटचे रस्ते करण्यासाठी ३२४ कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार केला आहे. या प्रकल्पासाठी नासुप्र व राज्य सरकार प्रत्येकी १०० कोटी रुपये देणार आहे. ७९ किलोमीटर लाबींच्या या रस्त्यांचे २२ पॅकेज तयार करण्यात आले असून रस्त्यांचे सर्वेक्षण सुरू झाले आहे. २० डिसेंबरपर्यंत पहिल्या ११ पॅकेजचे काम सुरू होईल. यापूर्वीही सिमेंट रस्त्यांसाठी महापालिकेतर्फे १०० कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते. या निधीत अतिरिक्त २६ किमीचे रस्ते बांधले जातील, असे महापौर दटके यांनी स्पष्ट केले.
मोकाट जनावरे गो-शाळेला देणार
शहरात रस्त्यांवर गाई, म्हशींसह मोकाट जनावरे फिरताना दिसतात. सध्या कोंडवाडा विभागातर्फे ही जनावरे पकडून कांजीहाऊसमध्ये बंद केली जातात. जनावरांचे मालक दंड भरून ते सोडवून नेतात व पुन्हा रस्त्यावर सोडतात. यावर स्थायी उपाय योजण्यासाठी महापालिकेतर्फे नवे धोरण आखण्यात येत आहे. या धोरणानुसार पकडलेल्या गाई, म्हशी, जनावरे गो-शाळेला दिली जातील. तेथेच त्यांचे संगोपन केले जाईल. यासाठी संस्थांनी पुढाकार घेतला तर महापालिका त्यांना जागा उपलब्ध करून देईल, असेही महापौरांनी स्पष्ट केले.