सुरक्षा व्यवस्थेतील गंभीर त्रुटी
By Admin | Updated: July 24, 2015 02:45 IST2015-07-24T02:45:58+5:302015-07-24T02:45:58+5:30
दहशतवादी कृत्य करून मुंबईत मोठा विध्वंस घडवून आणणाऱ्या आणि ३० जुलै रोजी फासावर चढवल्या जाणाऱ्या ...

सुरक्षा व्यवस्थेतील गंभीर त्रुटी
नागपूर : दहशतवादी कृत्य करून मुंबईत मोठा विध्वंस घडवून आणणाऱ्या आणि ३० जुलै रोजी फासावर चढवल्या जाणाऱ्या याकूब मेमनची शुबेल फारुख यांनी नागपूर मध्यवर्ती कारागृहात घेतलेली भेट ही सुरक्षा व्यवस्थेतील गंभीर त्रुटी समजली जात आहे.
फारुख हे मंगळवारच्या सकाळी अचानक नागपुरात अवतरले. त्यांच्यासोबत एक स्थानिक वकील होता. फारुख यांनी दिल्ली बार कौन्सिलचा सदस्य असल्याचे कारागृह प्रशासनाला सांगितले. बार कौन्सिलचा सदस्य असल्याचे ओळखपत्र सादर केले. केवळ या ओळखपत्राच्या आधारावर त्यांनी विशेष मुलाखत कक्षात याकूब मेमनची दीर्घ भेट घेतली. वास्तविक या ओळखपत्राची मुदत ३१ जानेवारी २०१३ रोजीच संपलेली होती. आपल्या दहशतवादी कृत्याने एक आठवड्यानंतर फासावर जाणाऱ्या याकूबची मुलाखत देण्यापूर्वीच वकील असल्याचे सांगणाऱ्या फारुखच्या ओळखपत्राची पडताळणी करणे आवश्यक होते. ओळखपत्र कालबाह्य असल्याचे समजताच प्रशासनाने फारुखकडून ओळखीचे अन्य पुरावे घेणे आवश्यक होते. तसे न करता थेट मुलाखत देणे म्हणजे सुरक्षा व्यवस्थेतील ही गंभीर त्रुटी होय, अशी प्रतिक्रिया जिल्हा वकील संघटनेचे अध्यक्ष अॅड. प्रकाश जयस्वाल यांनी प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केली. वकिलाच्या गणवेशात उत्तर प्रदेश आणि मुंबई न्यायालयात घातपातासारख्या घटना घडलेल्या आहेत. ३१ मार्च रोजी पाच खतरनाक गुन्हेगारांनी केलेल्या जेल ब्रेकनंतर नागपूर मध्यवर्ती कारागृहात मोठ्या प्रमाणावर मोबाईल आणि अंमलीपदार्थ आढळून आले होते. घातक शस्त्रेही सापडली होती. तथापि, शस्त्रे सापडण्याच्या बाबीवर पडदा टाकण्यात आला होता. बहुतांश आक्षेपार्ह वस्तू मुलाखत कक्षामार्फतच कारागृहात पोहोचल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. याकूब हा दहशतवादी असल्याने फारुखने घेतलेल्या मुलाखतीदरम्यान आणखी काही कट तर शिजला नाही, अशी शंका व्यक्त केली जात आहे. (प्रतिनिधी)