मतमोजणीला सुरक्षेचा घेरा

By Admin | Updated: October 19, 2014 00:56 IST2014-10-19T00:56:38+5:302014-10-19T00:56:38+5:30

उपराजधानीतील सहाही मतदारसंघाची मतमोजणी एकाचवेळी वेगवेगळ्या ठिकाणी सुरू होणार आहे. मतमोजणी प्रक्रियेदरम्यान होणारी गर्दी लक्षात घेता वाहतुकीस अडथळा निर्माण होऊ शकतो.

Security Scene of Countdown | मतमोजणीला सुरक्षेचा घेरा

मतमोजणीला सुरक्षेचा घेरा

विविध मार्गावरील वाहतुकीत बदल
नागपूर : उपराजधानीतील सहाही मतदारसंघाची मतमोजणी एकाचवेळी वेगवेगळ्या ठिकाणी सुरू होणार आहे. मतमोजणी प्रक्रियेदरम्यान होणारी गर्दी लक्षात घेता वाहतुकीस अडथळा निर्माण होऊ शकतो. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचाही प्रश्न निर्माण होऊ शकतो, हे ध्यानात घेत पोलिसांनी मतमोजणीच्या ठिकाणाला जोडणाऱ्या मार्गावरची वाहतूक बाजूने वळविली आहे.
पूर्व मतदारसंघ
नागपूर पूर्व मतदारसंघाची मतमोजणी ईश्वर देशमुख सांस्कृतिक शिक्षण महाविद्यालय, क्रीडा चौक, हनुमाननगर येथे पार पडणार आहे. त्यामुळे तुकडोजी पुतळ्याकडून आवारी चौकाकडे जाणारी वाहतूक मेडिकल कॉलेजकडे ईएसआय हॉस्पिटल चौकातून, शांतिनिकेतन कॉन्व्हेंट मार्गाने जाईल. आवारी चौकाकडून तुकडोजी पुतळा किंवा मेडिकलकडे जाणारी वाहतूक सक्करदरा चौक आणि अशोक चौकाकडून जाईल़ सोमवारी पेठ, बुधवारी बाजारमधून आवारी चौकाकडे जाणारी वाहतूक सक्करदरा चौकाकडून जाईल.
पश्चिम आणि उत्तर मतदारसंघ
पश्चिम आणि उत्तर मतदारसंघातील मतमोजणी जिल्हा परिषद (जुनी शासकीय) माध्यमिक शाळा काटोल रोड, नागपूर तसेच अण्णासाहेब गुंडेवार महाविद्यालय, काटोल रोड, नागपूर या ठिकाणी होणार आहे. त्यामुळे जुना काटोल नाका चौक ते छावनी दुर्गा मंदिर चौकपर्यंत दोन्ही बाजूने सर्व वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे़ छावणी दुर्गा मंदिर चौकाकडून जुना काटोल नाका चौकाकडे जाणारी वाहतूक छावणी वाय पॉईन्ट किंवा विजय नगरमार्गे पागलखाना चौक, पोलीस तलाव टी पॉईन्टमार्गे जाईल. जुना काटोल नाका चौकाकडून छावणी दुर्गा मंदिर चौकाकडे जाणारी वाहतूक पोलीस तलाव टी पॉईन्ट ते पागलखाना किंवा विजयनगरमार्गे छावणी दुर्गा मंदिर किंवा छावणी वाय पॉईन्टकडे जाईल.
पार्किंगचे ठिकाण
अण्णासाहेब गुंडेवार महाविद्यालय व जिल्हा जिल्हा परिषद माध्यमिक शाळा परिसरात शासकीय वाहनांचे पार्किंग राहील. जुना काटोल नाका चौक ते छावणी दुर्गा मंदिर चौकाकडे जाणाऱ्या मार्गावर दोन्ही बाजूस नागरिकांनी आपली वाहने पार्क करावी.
दक्षिण मतदारसंघ
दक्षिण मतदारसंघातील मतमोजणी सांस्कृतिक बचत भवन, हरदेव हॉटेलजवळ पार पडणार आहे. त्यामुळे आनंद टॉकीज ते धंतोली ओव्हर ब्रीजपर्यंत दोन्ही बाजूने सर्व प्रकारच्या वाहनास प्रवेश बंद करण्यात आला आहे़. या भागातील वाहतूक खालील मार्गाने वळविण्यात येईल. आनंद टॉकीज ते धंतोली ओव्हर ब्रीजकडे जाणारी वाहतूक आनंद टॉकीज ते मुंजे चौक व नवीन रेल्वे अंडर ब्रिज तसेच शनिमंदिर या मार्गाने जाईल. धंतोली ओव्हर ब्रीज ते आनंद टॉकीजकडे जाणारी वाहतूक ही पोलीस स्टेशन धांतोली, मेहाडीया चौक तसेच सरदार पटेल चौकमार्गे जाईल.
पार्किंगचे ठिकाण
औद्योगिक प्रशिक्षण संस्था(मुलींची), बचत भवनचे बाजूला शासकीय वाहनांकरिता राखीव.
तंत्रनिकेतन शाळा, सरस्वती नाईट हायस्कूल, आरोग्यविभाग झोन क्ऱ ४, मॉरिस कॉलेज फुटबॉल ग्राउंड, या ठिकाणी नागरिकांनी वाहने पार्क करावी.
दक्षिण पश्चिम मतदारसंघ
दक्षिण पश्चिम मतदारसंघातील मतमोजणी कुर्वेज न्यू मॉडेल हायस्कूल, माता कचेरी चौकाजवळ होणार आहे. ती सुरळीत पार पाडावी म्हणून या भागातील वाहतूक वळविण्यात आली आहे. त्यानुसार, कृपलानी टी पॉईन्ट ते माताकचेरी (दीक्षाभूमी चौक ) दोन्ही बाजूने सर्व प्रकारच्या वाहनास प्रवेश बंद करण्यात येत आहे़ ही वाहतूक खालील मार्गाने वळविण्यात आली आहे. कृपलानी टी पॉईन्ट ते माताकचेरी (दीक्षाभूमी चौक) कडे जाणारी वाहतूक अजनी चौक व लोकमत चौकामार्गे जाईल. माताकचेरी (दीक्षाभूमी चौक) ते कृपलानी टी पॉंईंटकडे जाणारी वाहतूक नीरी टी पॉईन्ट व काचीपुरा चौक यामार्गे जाईल़
पार्किंगचे ठिकाण
औद्योगिक प्रशिक्षण संस्था, श्रध्दानंदपेठ या ठिकाणी शासकीय वाहनांकरिता तर, दीक्षाभूमी, न्यू इंग्लिश हायस्कूल व होमगार्ड कार्यालय, कॉंग्रेस नगर या ठिकाणी नागरिकांना वाहने पार्क करता येतील.
मध्य मतदारसंघ
शेतकरी भवन फुटाळा रोड, तेलंगखेडी, नागपूर येथे नागपूर मध्य मतदार संघातील मतमोजणी होणार आहे. त्यामुळे शासकीय दूध डेअरी टी पॉईन्ट ते तेलंगखेडी मंदिरपर्यंत दोन्ही बाजूने वाहतूक बंद करण्यात आली आहे़ तेलंगखेडी मंदिर ते विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्या बंगल्यापर्यंत तसेच बंगल्याकडून शेतकरी भवनकडे जाणाऱ्या मार्गावर वाहतुकीस दोन्ही बाजूने प्रतिबंध करण्यात आला आहे. जपानी गार्डन चौकाकडून तेलंगखेडीकडे जाणारी वाहतूक शासकीय दूध डेअरी टी पॉईन्टपासून डावे वळण घेऊन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयासमोरून तेलंगखेडी गार्डन ते भारतीय कृष्ण विद्याविहार शाळेमार्गे जाईल. तेलंगखेडी चौकाकडून जपानी गार्डन चौकाकडे जाणारी वाहने भारतीय कृष्ण विद्याविहार शाळा ते तेलंगखेडी गार्डनमार्गे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयमार्गे डावीकडे वळण घेऊन शासकीय दूध डेअरी टी पॉईन्ट कडून जातील.
पार्किंगचे ठिकाण
शेतकरी भवन ते विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्या बंगल्याकडे जाणाऱ्या मार्गावर शासकीय वाहने तसेच विशेष पोलीस महानिरीक्षक यांचे बंगल्यासमोरील रोडवर तेलंगखेडीपर्यंत नागरिकांना त्यांची वाहने पार्क करता येतील.

Web Title: Security Scene of Countdown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.