नितीन गडकरींच्या निवासस्थानासह कार्यालयाची सुरक्षा वाढविली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2023 21:00 IST2023-05-16T20:59:40+5:302023-05-16T21:00:12+5:30
Nagpur News केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांना परत एकदा फोनवरून धमकी देण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. त्यांचे वर्धा मार्गावरील निवासस्थान व सावरकर नगरातील कार्यालयाच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.

नितीन गडकरींच्या निवासस्थानासह कार्यालयाची सुरक्षा वाढविली
नागपूर : केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांना परत एकदा फोनवरून धमकी देण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. दिल्लीतील निवासस्थानी हा फोन करण्यात आला असला तरी नागपुरातील अगोदरच्या दोन घटना लक्षात घेता त्यांचे वर्धा मार्गावरील निवासस्थान व सावरकर नगरातील कार्यालयाच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी तेथील सुरक्षेचा आढावादेखील घेतला.
गडकरी यांच्या कार्यालयात कुख्यात जयेश पुजारी उर्फ शाकीर याने बेळगाव कारागृहातून जानेवारी व मार्च महिन्यात फोन करून खंडणी मागितली होती. या प्रकरणात जयेशला नागपुरातदेखील आणण्यात आले व चौकशीतून त्याच्या मोठ्या दहशतवादी ‘लिंक्स’ समोर आल्या. ते प्रकरण गृहमंत्रालयानेदेखील गंभीरतेने घेतले व ‘एनआयए’कडे चौकशी सोपविली. अशा स्थितीत परत एकदा गडकरी यांना धमकीचा फोन येणे ही चिंताजनक बाब आहे. नागपूर पोलिसांनी सावध पवित्रा घेतला असून त्यांच्या निवासस्थान व कार्यालयाची सुरक्षा तातडीने वाढविण्यात आली. दोन्ही ठिकाणी सशस्त्र पोलिस तैनात करण्यात आले आहेत. तसेच निवासस्थानी बीडीडीएसचे पथकदेखील पाठविण्यात आले होते.