Security guard's son receives a Netherlands scholarship | सुरक्षा रक्षकाच्या मुलाला मिळाली नेदरलॅन्डची शिष्यवृत्ती

सुरक्षा रक्षकाच्या मुलाला मिळाली नेदरलॅन्डची शिष्यवृत्ती

ठळक मुद्देपीएच.डी.साठी जाणारशासकीय नोकरीही सोडली

निशांत वानखेडे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : त्याचे वडील सुरक्षा रक्षक, तुटपुंज्या मिळकतीत मुलांचे शिक्षण आणि कुटुंबाचा गाडा हाकणारे. हा मात्र शिक्षणाचा ध्यास घेतलेला. व्हीएनआयटीच्या गेटसमोरून सायकलने शाळेत जाताना याच महाविद्यालयात शिकायचे, असे स्वप्न बालपणापासूनच मनात होते. हेच स्वप्न त्याचे ध्येय झाले. झपाटल्यासारखी मेहनत केली आणि स्वत:च्या गुणवत्तेने हालाखीच्या परिस्थितीतून मार्ग काढत इंजिनीअरिंग, एम.टेक. व पुढे एमपीएससीचीही परीक्षा उत्तीर्ण करून सहायक अभियंता म्हणून नोकरी मिळविली. पण उच्च शिक्षणाचा ध्यास सुटत नव्हता. मग एक दिवस नोकरी सोडली अन् प्रयत्नाच्या बळावर थेट पीएचडीसाठी नेदरलँडच्या तंत्रज्ञान विद्यापीठाची अ‍ॅडमिशन पक्की केली.
आयटी पार्कजवळच्या कामगार कॉलनीतील छोट्याशा घरी व्हिजासाठी अर्ज करून नेदरलँडला जाण्याच्या तयारीत गुंतलेला सुमित आणि मुलाच्या कर्तृत्त्वाने डोळ्यात चमक असलेले वडील मोरेश्वर मेश्राम व आईशी गुरुवारी भेट झाली. प्रश्न केला तेव्हा हा सर्व प्रवास सुमितच्या डोळ्यासमोर आला. दोन भाऊ व बहीण असे कुटुंब. वडील मोरेश्वर हे सीताबर्डी येथे फुटपाथवर खेळणी विकायचे व रात्री सुरक्षा रक्षक म्हणून काम करायचे. परिस्थिती नसतानाही मुलांच्या शिक्षणाचा मार्ग त्यांनी सुकर केला. मुलांनीही आईवडिलांच्या प्रयत्नांना परिश्रमाची जोड दिली. सुमित जरा अभ्यासात सरसच होता. गुणवत्तेने ५ वी ते १० वीपर्यंत इंग्रजी माध्यमाच्या सरस्वती शाळेत व नंतर बारावीपर्यंत सोमलवार कॉलेजमध्ये शिक्षण झाले. परिस्थितीमुळे पुढचा प्रवास अडचणीचा होता. यावेळी राज्य शासनाने इंजिनीअरिंग करणाऱ्या अनुसूचित जातीच्या गुणवंत विद्यार्थ्यांसाठीची योजना त्याच्या कामी आली. व्हीएनआयटी मिळाले नाही पण दुसऱ्या महाविद्यालयात अभियांत्रिकीला प्रवेश मिळाला आणि दररोज सायकलने प्रवास करीत हा अभ्यासही सुमितने गुणवत्तेने पूर्ण केला. या बुद्धीच्या जोरावर शासकीय शिष्यवृत्तीच्या आधारे आयआयटी रुडकीमध्ये त्याचा प्रवेश निश्चित झाला आणि व्हीएनआयटीसारख्या नामांकित संस्थेत शिकण्याचे स्वप्न पूर्ण झाले. येथे मिळणाऱ्या स्टायफंडमधून पोटाला चिमटा देत काही पैसे घरी पाठवत कुटुंबाला मदत दिली. प्रचंड परिश्रम करून दोन वर्षात एम.टेक. पूर्ण केले.
याच काळात त्याने एमपीएससी परीक्षेची तयारीही चालविली होती आणि पहिल्याच प्रयत्नात ती उत्तीर्ण करून पाटबंधारे विभागात सहायक अभियंता म्हणून नोकरीला लागला.
घरातील मोठा मुलगा म्हणून कुटुंबाची सर्व जबाबदारी त्याने खांद्यावर घेतली. झोपडीचे घर झाले, लहान बहिणीचे लग्न केले आणि भावाला टाटा इन्स्टिट्यूटमध्ये उच्च शिक्षणासाठी पाठविले. जबाबदाऱ्या पार पाडतानाही पीएचडी करण्याचे ध्येय काही स्वस्थ बसू देत नव्हते. त्यामुळे त्याने नोकरी सोडण्याचा निर्धार केला. वडिलांनी थोडा विरोध केला आणि अनेकांनी त्याला मूर्खातच काढले. तो निर्णयावर ठाम होता. त्याने नोकरी सोडली. त्याने पाठविलेला संशोधनाचा विषय आवडल्याने नेदरलँडच्या डेल्फ्ट विद्यापीठाने सुमितचा प्रवेश निश्चित केला. राज्य व केंद्र शासनाची शिष्यवृत्तीही त्याला मंजूर झाली. सध्या व्हिजाची प्रक्रिया सुरू असून तो पुढच्या महिन्यात नेदरलँडला रवाना होणार आहे.

संशोधनाचा विषय : शेतकरी समस्या व उपाय
पाटबंधारे विभागात काम करताना शेतकऱ्यांच्या समस्यांमुळे सुमितचे मन कासाविस झाले. आपल्याला काही करता येईल का, या विचाराने ‘शेतकरी आत्महत्या, समस्या आणि उपाय’ या विषयावर संशोधन करण्याचा निश्चय केला. नेदरलँड हा देश विदर्भाएवढा आहे मात्र शेतीच्या बाबतीत अत्यंत प्रगत आहे. तेथील कृषिमाल जगभरात निर्यात केला जातो कारण तशी व्यवस्था व तंत्रज्ञान त्यांनी उपयोगात आणले आहे. त्यावर संशोधन करून आपल्या देशातील शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी उपाय करण्याचे त्यांचे प्रयत्न आहेत.

चार विद्यापीठाकडूनही ऑफर
सुमित मेश्राम यांना हंगेरियन विद्यापीठ तसेच युनेस्कोतर्फे विद्यापीठात संशोधन करण्याची ऑफर प्राप्त झाली आहे. त्यासाठी शिष्यवृत्ती देण्याचेही मान्य करण्यात आले. याशिवाय युकेच्या दोन विद्यापीठांनीही प्रवेश घेण्यासाठी निमंत्रण पाठविले होते. सुमित यांनी मात्र नेदरलँडची निवड केली. जगातील टॉप ५० विद्यापीठात असलेले नेदरलँडचे डेल्फ्ट विद्यापीठ कृषी तंत्रज्ञानाच्या संशोधनासाठी परफेक्ट असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: Security guard's son receives a Netherlands scholarship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.