मिशन इंद्रधनुषचा दुसरा टप्पा २२ मार्चपासून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:13 IST2021-03-04T04:13:33+5:302021-03-04T04:13:33+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : मिशन इंद्रधनुष मोहिमेंतगर्त नागपूर महापालिका क्षेत्रात २२ मार्चपासून लसीकरणाच्या दुसऱ्या फेरीला सुरुवात होत ...

मिशन इंद्रधनुषचा दुसरा टप्पा २२ मार्चपासून
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मिशन इंद्रधनुष मोहिमेंतगर्त नागपूर महापालिका क्षेत्रात २२ मार्चपासून लसीकरणाच्या दुसऱ्या फेरीला सुरुवात होत आहे. याअंतर्गत ० ते २ वर्ष वयोगटातील बालके व गरोदर मातांना लस मोफत देण्यात येणार आहे. लसीकरणाच्या पहिल्या फेरीला २२ फेब्रुवारीपासून सुरुवात झाली आहे. ती १५ दिवस सुरू आहे. ही लस मनपाच्या सर्व नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये देण्यात येत आहे.
मागील वर्षात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अनेक बालके नियमित लसीकरणापासून वंचित राहिली. त्यामुळे प्रत्येक बालकाला लस मिळावी यासाठी मनपाद्वारे ही मोहीम दोन फेरीमध्ये सुरू करण्यात आली आहे. दुसरी फेरी २२ मार्चपासून पुढील १५ दिवस सुरू राहणार आहे.
नियमित लसीकरण व कोरोना लसीकरणाचे दिवस वगळून अतिरिक्त सत्र घेऊन सुटलेल्या ० ते २ वर्ष वयोगटातील बालक व गरोदर मातांना ही लस देण्यात येईल. जवळच्या मनपा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन लस घेण्याचे आवाहन वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. संजय चिलकर व माता-बाल संगोपन नोडल अधिकारी डॉ. वैशाली मोहकर यांनी केले आहे.
दोन वर्षाखालील बालके व त्यांच्या मातांचा सन २०२० पर्यंत सात प्रकारच्या रोगांपासून लसीकरणाच्या माध्यमातून बचाव करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने २०१४ साली ‘मिशन इंद्रधनुष’ ही मोहीम सुरू केली. यामध्ये घटसर्प, डांग्या खोकला, धनुर्वात, पोलिओ, क्षयरोग, देवी व कावीळ-ब तसेच काही राज्यांमध्ये हिमोफेलिया व इन्फ्लुएन्झा या लसींचा समावेश आहे. संपूर्ण लसीकरण म्हणजे किमान ९० टक्के लसीकरणाची पातळी गाठणे अपेक्षित आहे. २००९ मध्ये हे प्रमाण ६१ टक्के, २०१३ मध्ये ६५ टक्के असून, २०२० अखेर हे प्रमाण ९० टक्के करावयाचे होते.