दुहेरी हत्याकांडात दुसरा आरोपी ताब्यात

By Admin | Updated: November 20, 2015 03:22 IST2015-11-20T03:22:27+5:302015-11-20T03:22:27+5:30

इंद्रप्रस्थनगर जयताळा येथील दुहेरी हत्याकांडात सोनेगाव पोलिसांनी ओमप्रकाश शहारे (वय २९, रा. पाटील लेआऊट) याला संशयावरून ताब्यात घेतले तर,

The second accused in the double murder case | दुहेरी हत्याकांडात दुसरा आरोपी ताब्यात

दुहेरी हत्याकांडात दुसरा आरोपी ताब्यात

नागपूर : इंद्रप्रस्थनगर जयताळा येथील दुहेरी हत्याकांडात सोनेगाव पोलिसांनी ओमप्रकाश शहारे (वय २९, रा. पाटील लेआऊट) याला संशयावरून ताब्यात घेतले तर, यापूर्वी अटक करण्यात आलेला आरोपी मनोज सुरेश भारद्वाज (वय २९, रा. अनंतनगर जयताळा) याला कोर्टात हजर करून त्याचा २५ तारखेपर्यंत पीसीआर मिळवला.
मंगळवारी रात्री इंद्रप्रस्थनगरातील रेल्वेच्या डम्पिंग यार्डजवळ बंटी ऊर्फ संदीप शरद आटे (वय २५, रा. तुकडोजीनगर) आणि रवी प्रकाश टुले (वय २६, रा. गोपालनगर) या दोघांची निर्घृण हत्या झाली होती. बुधवारी सकाळी हे दुहेरी हत्याकांड उघडकीस आले. त्यानंतर ठाणेदार अरुण जगताप आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तातडीने धावपळ करीत आरोपी मनोजला अटक केली.
त्याने या दुहेरी हत्याकांडाची कबुली दिली. हत्येचे कारण सांगताना त्याने रवीच्या प्रेयसीच्या दुचाकीचे कारण पुढे केले. त्यानुसार, रवीचे एका विधवा महिलेशी वर्षभरापासून अनैतिक संबंध होते. तिने रवीला काही दिवसांपूर्वी प्लेझर दिली. रवीने ही दुचाकी मनोजला वापरायला दिली. मनोजकडून दुचाकी परत घेतल्यानंतर ती गहाण ठेवली. हा प्रकार मनोजने रवीच्या प्रेयसीला सांगितला. (प्रतिनिधी)

बनवाबनवीमुळे संशय
विशेष म्हणजे, बंटी आणि रवीला आपण एकट्यानेच मारल्याचे आरोपी मनोज पोलिसांना सांगत आहे. मात्र, एकूणच घटनाक्रम बघता पोलिसांना तो खोटे बोलत असावा, असा संशय आहे. त्याचमुळे पोलिसांनी आलटून पालटून त्याची चौकशी केली असता त्याने रात्री उशिरा या घटनेच्या वेळी शहारे तेथेच उभा होता, असे सांगितले. प्रारंभी शहारेने ते नाकारले होते. आपण या दोघांचे भांडण सुरू होताच तेथून निघून गेल्याचे म्हटले होते. त्यामुळे पोलिसांनी त्यालाही गुरुवारी ताब्यात घेतले.
प्रेयसीचा दोन तासांपूर्वीच फोन
या दुहेरी हत्याकांडात पुन्हा एक धक्कादायक माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार, घटनेच्या दोन तासांपूर्वी रवीच्या प्रेयसीचा मनोजला फोन आला होता. या दोघांची त्यावेळी बातचित झाली. त्यामुळे रवीच्या प्रेयसीचीही भूमिका संशयास्पद ठरली आहे. मनोज नेमका रवीच्या प्रेयसीशी कधी जुळला आणि तिची या हत्याकांडात काय भूमिका आहे, असा प्रश्न पोलिसांना पडला आहे. त्याचमुळे पोलिसांनी तिचीही चौकशी केली. तिने फोन केल्याचे मान्य केले. ती तीन मुलींची आई आहे. १० वर्षांपूर्वी तिच्या पतीचे निधन झाले. ती एका कंपनीत काम करते. रवी तिला सीताबर्डीत आणायचा आणि कार्यालयातून परत घरी न्यायचा. तिने मनोजला हत्याकांडाच्या दोन तासांपूर्वी कशासाठी फोन केला होता, या प्रश्नाचे पोलीस उत्तर शोधत आहेत.

Web Title: The second accused in the double murder case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.