मधुमक्षिका पालनातून शोधला जोडधंदा
By Admin | Updated: April 17, 2017 02:47 IST2017-04-17T02:47:18+5:302017-04-17T02:47:18+5:30
मागील काही वर्षांत विज्ञान-तंत्रज्ञानाने क्रांती केली आहे. मग शिक्षण असो, की संरक्षण. आरोग्य असो

मधुमक्षिका पालनातून शोधला जोडधंदा
वर्षभरात लाखोंचे उत्पन्न : आप्तूर गावातील शेतकऱ्यांचा यशस्वी प्रयोग
नागपूर : मागील काही वर्षांत विज्ञान-तंत्रज्ञानाने क्रांती केली आहे. मग शिक्षण असो, की संरक्षण. आरोग्य असो, की कृषी. प्रत्येक क्षेत्रात नवनवीन संशोधन होत आहे. कृषी क्षेत्रातील संशोधन आणि तंत्रज्ञान शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत आहे. शेतकरी यातून जोडधंदे शोधत आहेत. असाच उमरेड तालुक्यातील आप्तूर या गावातील काही तरुण शेतकऱ्यांनी मधुमक्षिकापालनातून शेतीला जोडधंदा शोधला आहे.
या गावातील सात शेतकऱ्यांनी एक गट तयार करून हा यशस्वी प्रयोग केला आहे. या शेतकऱ्यांच्या मते, त्यांच्या गावात प्रामुख्याने सूर्यफुलाचे पीक घेतले जात असून, दरवर्षी ५०० ते ७०० हेक्टरमध्ये या पिकाची लागवड होते. परंतु सूर्यफुलाच्या भरघोस उत्पादनासाठी त्याचे परागीकरण होणे आवश्यक असते. या तरुण शेतकऱ्यांनी ही गोष्ट लक्षात घेऊन, मागील वर्षीपासून आपल्या सूर्यफुलाच्या शेतीत ‘मधुमक्षिकापालन’ चा प्रयोग सुरू केला आहे. यात या शेतकऱ्यांनी मागील वर्षी मधमाशांच्या एकूण ७० पेट्या आपल्या शेतात लावल्या होत्या. त्यातून या शेतकऱ्यांना एकूण ८०० किलोग्रॅम मध मिळाले. यानंतर शेतकऱ्यांनी प्रति किलो २०० रुपये भावाने त्या मधाची विक्री केली. यातून शेतकऱ्यांना १ लाख ६० हजार रुपयांचे अतिरिक्त उत्पन्न मिळाले. शिवाय त्यांच्या सूर्यफुल पिकाचे उत्तम परागीकरण होऊन उत्पादनातही वाढ झाली.
हा पहिल्या वर्षीचा प्रयोग यशस्वी झाल्याने यंदा या सर्व शेतकऱ्यांनी पुन्हा नवीन ४० पेट्या खरेदी करू न, त्या आपल्या शेतात लावल्या आहेत. त्यांचा हा प्रयोग तालुक्यातील अन्य शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. या प्रयोगशील शेतकऱ्यांमध्ये स्वप्निल कळंबे, भगवान डहाके, शामसुंदर कळंबे, यादव इटणकर, नरेंद्र कळंबे व गणेश मोरे यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, या सर्व शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या ‘आत्मा’ यंत्रणेव्दारे प्रशिक्षण दिले जात आहे. यात त्यांना मधुमक्षिकापालनाच्या तंत्रज्ञानासह मध विक्री कुठे व कशी करावी, याविषयी मार्गदर्शन केले जात आहे. (प्रतिनिधी)