मोमीनपुऱ्यातील हॉटेल्सना लागणार सील!
By Admin | Updated: February 11, 2015 02:35 IST2015-02-11T02:35:25+5:302015-02-11T02:35:25+5:30
रात्री उशिरापर्यत सुरू राहणाऱ्या मोमीनपुऱ्यातील हॉटेलांना सील ठोकण्याच्या तयारीला तहसील पोलीस लागले आहे.

मोमीनपुऱ्यातील हॉटेल्सना लागणार सील!
नागपूर : रात्री उशिरापर्यत सुरू राहणाऱ्या मोमीनपुऱ्यातील हॉटेलांना सील ठोकण्याच्या तयारीला तहसील पोलीस लागले आहे. त्यामुळे येथील रात्रभर असणारी वर्दळ लवकरच थांबणार आहे.
पोलिसांनी नियमबाह्य हॉटेल व्यवसाय करणाऱ्यांच्या मुसक्या आवळण्याची तयारी केल्याने हॉटेल व्यावसायिकांत खळबळ उडाली आहे. मोमीनपुरा येथे १००च्या आसपास हॉटेल्स (खानावळी) आहेत. ते २४ तास सुरू असतात. मात्र शहरातील इतर भागातील हॉटेल्स रात्रीच्या सुमारास बंद असतात.
हॉटेल व्यावसायिकांना पोलिसांकडून खानावळीचा परवाना दिला जातो. त्यानुसार रात्री ११.३० पर्यत ग्राहकांना हॉटेलमध्ये प्रवेश देण्याची अनमुती आहे. त्यानंतर १ तासाने म्हणजेच १२.३० ला हॉटेल बंद करणे अपेक्षित असते. या नियमाचे उल्लंघन केल्यास मुंबई पोलीस कायद्यान्वये कारवाई केली जाते.
मोमीनपुऱ्यात दिवसाच्या तुलनेत रात्रीला ग्राहकांची वर्दळ अधिक असते. त्यामुळे या भागातील हॉटेल्स २४ तास सुरू असतात. यात पोलिसांचीही चांगली कमाई होते. अधिकाऱ्यांच्या दबावात पोलीस कर्मचारी कारवाई करतात. परंतु ‘वसुलीचे उद्दिष्ट’पूर्ण करण्यासाठी ही कारवाई दर्शवली जाते. दंड भरून हॉटेल चालक न्यायालत आपली सुटका करून घेतात.
अभिनाश कुमार यांनी झोन ३ ची सूत्रे स्वीकारल्यापासून या भागातील परिस्थिती बदलली आहे. सर्वांवर समान कारवाई करण्यात यावी. वारंवार दंड आकारल्यानंतर या भागातील हॉटेल बंद करण्याची अनुमती न्यायालयाला मागितली आहे. यासाठी प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी यांच्या न्यायालयात पोलिसांनी अर्ज केला आहे. (प्रतिनिधी)