एस.डी.-आर.डीं.च्या हिंदोळ्यावर झुललेला ‘दि. बर्मन्स’

By Admin | Updated: September 12, 2014 00:49 IST2014-09-12T00:49:39+5:302014-09-12T00:49:39+5:30

एस. डी. आणि आर. डी. बर्मन म्हणजे चित्रपट संगीताचे सुवर्णयुग गाजविणारे पितापुत्र. जीवनाच्या सर्व पैलूंना स्पर्श करणारी आणि आयुष्याचे तत्त्वज्ञानही सहजपणे गीतांतून मांडणारे हे संगीतकार आहेत.

SD -RD's collapsed on 'Hindoli' Burmans' | एस.डी.-आर.डीं.च्या हिंदोळ्यावर झुललेला ‘दि. बर्मन्स’

एस.डी.-आर.डीं.च्या हिंदोळ्यावर झुललेला ‘दि. बर्मन्स’

आदित्य-अनघा परिवाराचे आयोजन : सूरसंगमचे सुरेल सादरीकरण
नागपूर : एस. डी. आणि आर. डी. बर्मन म्हणजे चित्रपट संगीताचे सुवर्णयुग गाजविणारे पितापुत्र. जीवनाच्या सर्व पैलूंना स्पर्श करणारी आणि आयुष्याचे तत्त्वज्ञानही सहजपणे गीतांतून मांडणारे हे संगीतकार आहेत. दोघांच्याही गीतसंगीतात मस्ती आहे, उन्मादही आहे अन् तितकेच गांभीर्य आणि हळवेपणाही आहे. त्यांनी संगीतबद्ध केलेले प्रत्येकच गीत रसिकांना प्रिय असले तरी आजच्या कार्यक्रमात मात्र अनोखा प्रयोग करण्यात आला. एखादी भावना संगीतातून एस. डी कसे मांडतात आणि तीच भावना नंतर आर. डी. यांनी कशी व्यक्त केली, याचे प्रात्यक्षिकच गीतांच्या माध्यमातून समोर आले. दोघांचीही शैली वेगळी, मिजाज वेगळा पण भावना कधी बदलत नाही. नेमकेपणाने प्रेम, विरह, व्याकुळता, आनंद, उन्माद आणि दु:ख व्यक्त करणारी ही गीते रसिकांना आनंद देतानाच त्यांच्या भावनांशी ‘रिलेट’ करणारी होती. एस. डी. आणि आर. डी. यांच्या गीतांच्या, संगीताच्या आणि आठवणींच्या हिंदोळ्यावर झुललेला हा ‘दि बर्मन्स’ कार्यक्रम रसिकांनी आज ‘एन्जॉय’ केला.
आदित्य -अनघा परिवाराच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. हा ‘दि बर्मन्स - जर्नी आॅफ लाईफ’ कार्यक्रम डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात झाला. सूरसंगमच्या कलावंतांनी तयारीने गीतांचे सादरीकरण करून यावेळी रसिकांची दाद घेतली. भरगच्च सभागृहातून प्रत्येक गीताला ‘वन्समोअर’ मिळत असल्याने रसिकांचा सन्मान राखत हा कार्यक्रम रंगत गेला. निवेदक नासिर खान आणि श्वेता शेलगावकर यांच्या संयत, परिपक्व संचालनाने कार्यक्रमाची उंची वाढली. प्रेक्षकांशी संवाद साधत एस. डी, आर. डी. च्या अनेक आठवणींचा पट त्यांनी यावेळी थोडक्यात उलगडल्याने रसिकांसाठी ही संकल्पना आणि कार्यक्रम वेगळा आणि आनंददायी ठरला. या कार्यक्रमाची संकल्पना अनघा सराफ आणि विशाल गुरव यांची होती. एस. डी आणि आर. डी. यांच्या गीतांचे युग्म यावेळी सादर करण्यात आले. त्यामुळे एकाचवेळी दोघांच्याही सांगितीक अभिव्यक्तीचा आनंद रसिकांना घेता आला. ‘चंदा है तू मेरा सूरज...आणि बडा नटखट है...’ या लोकप्रिय गीतांनी कार्यक्रमाला प्रारंभ करण्यात आला. त्यानंतर सागर मधुमटकेने ‘एक लडकी भिगी भागी सी...’ तर सुरभी ढोमणेने ‘ये लडका हाय कितना है दिवाना...’ हे गीत सादर करून वातावरणनिर्मिती साधली.
कार्यक्रमात सागर मधुमटके, सारंग जोशी, शशी वैद्य, सुरभी ढोमणे आणि रसिका चाटी यांनी तयारीने गीत सादर करून जवळपास प्रत्येकच गीताला ‘वन्समोअरची दाद घेतली. यावेळी एस.डी. व आर. डी. यांचे एक-एक गीत जोडीने सादर करण्यात आले. ‘मेरे सपनो की रानी कब आणि जाने जा धुंडता फिर कहाँ’ सागर आणि सारंगने सादर केले. ‘ओ पंछी प्यारे - आज कल पाव जमीं पर नही पडते मेरे’ रसिका चाटी आणि सुरभी यांनी सादर केले. ‘पिया तो से नैना लागे रे आणि तुमने मुझे देखा’ सुरभी आणि शशी वैद्यने सादर करून रसिकांची दाद घेतली. शशी वैद्य आणि सारंग जोशी यांनी आपल्या खास अंदाजात गीत सादर करून आनंद दिला. सागर, सुरभी आणि रसिका चाटी यांच्या गीतांनी ही मैफिल अधिक रंगतदार ठरली. यावेळी ‘रात का समां, पिया बिना.., देखो रुठा ना करो.., सर जो तेरा टकराए.., रिमझिम के तराने, रिमझिम गिरे सावन, रुठ ना जाना तुमसे कहूँ तो, कह दू तुम्हे...’ आदी गीतांचे सादरीकरण करण्यात आले.
ध्वनियंत्रणा स्वप्नील उके, प्रकाशयोजना शिवशंकर माळोदे, नेपथ्य राजेश अमीन, सजावट सुनील हमदापुरे, संयोजन मो. सलीम शेख यांच होते. गायकांना विविध वाद्यांवर साथसंगत करणाऱ्यात महेन्द्र ढोले, परिमल जोशी, प्रसन्न वानखेडे, रिंकू निखारे, अजय वेखंडे, अमर शेंडे, विक्रम जोशी, पंकज यादव, सचिन ढोमणे, अरविंद उपाध्ये, नंदू गोहाणे, राजू गजभिये यांचा सहभाग होता. संगीत संयोजन सचिन ढोमणे यांचे होते. कार्यक्रमाला आदित्य-अनघाचे उपाध्यक्ष अजित भाकरे आणि सर्व संचालक उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: SD -RD's collapsed on 'Hindoli' Burmans'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.