सुमेध वाघमारे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाची दहशत कमी होत नाही तोच स्क्रब टायफसने डोकेवर काढले आहे. सध्या खासगी हॉस्पिटमध्ये दोन रुग्ण उपचार घेत आहेत, तर ‘एम्स’मध्ये ‘ओपीडी’स्तरावर ३ रुग्ण आढळून आले आहेत. विशेष म्हणजे, २०१८ मध्ये सर्वाधिक १५५ रुग्ण व २९ रुग्णांचा जीव गेला होता. यावर्षी पावसाचा जोर अधिक असल्याने या आजाराचा रुग्णांत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
‘चिगर माइट्स’मधील ‘ओरिएन्शिया सुसुगामुशी’ जंतू मानवी शरीरात प्रवेश केल्याने ‘स्क्रब टायफस’ होतो. हे ‘माईट्स’ उंदराच्या शरीरावर चिकटून राहतात, त्याच्या रक्तावर वाढतात. पावसाळ्याच्या दिवसात उंदराच्या बिळात पाणी शिरले की ते बिळाबाहेर येतात. त्यांच्या शरीरावरील ‘माईट्स’ हे उंच गवत, शेतात, झाडी-झुडपात पसरतात. या जीवाणूचा संपर्कात जी व्यक्ती येत त्याच्या त्वचेवर चिकटून बसतात. मानवी शरीरातील पेशींना ते द्रवरूपात रूपांतर करून ओढून घेतात. त्यांच्यातील ‘ओरिएन्शिया सुसुगामुशी’ जंतू मानवी शरीरात प्रवेश करतात. चावण्याच्या ठिकाणी दुखत नाही. यामुळे काही चावल्याचे भान राहत नाही. चावलेल्या ठिकाणी व्रण येतो. ज्याला ‘इशर’ म्हणतात. हा ‘इशर’ या आजाराची ओळख आहे. परंतु सर्वांमध्ये ‘इशर’ दिसूनच येईल, असे नाही. या आजारावर औषधी नाही. यामुळे तातडीने निदान होऊन उपचार घेणे आवश्यक आहे. सध्या खासगी हॉस्पिटलमध्ये स्क्रब टायफसचे दोन रुग्ण उपचार घेत असल्याचा वृत्ताला मनपाचा हिवताप व हत्तीरोग विभागाचा दीपाली नासरे यांनी दुजोरा दिला आहे.
-५० टक्के रुग्णांना मृत्यूचा धोका
स्क्रब टायफसच्या ५० टक्के रुग्णांना यकृतासह न्यूमोनियाचा त्रास होण्याची शक्यता अधिक असते. शिवाय, कावीळ व श्वसनाचा त्रास होण्याचा धोका असतो. साधारण २५ टक्के रुग्णांना मेंदूचा आजार होतो. अनेकांच्या रक्तातील प्लेटलेट्स आणि पांढऱ्या पेशी कमी होतात. योग्य उपचार मिळाले नाही, तर ५० टक्के रुग्णांचा मृत्यू होतो.
-ही आहेत लक्षणे
या आजारात सुरुवातीला ताप, कोरडा खोकला, डोकेदुखी, हातपाय दुखणे, मळमळ, उलट्या, चालताना तोल जाणे, लालसर पुरळे येणे आणि इतर तापाच्या रोगासारखी लक्षणे आढळतात. परंतु ४० टक्के लोकांमध्ये ही लक्षणे दिसतीलच असे नाही.
-सप्टेंबरमध्ये वाढण्याची शक्यता
‘एम्स’चा ‘ओपीडी’स्तरावर ‘स्क्रब टायफस’चे जवळपास तीन रुग्ण आढळून आले. त्यांना गंभीर लक्षणे नव्हती. या आजारावर ‘डॉक्सीसायक्लीन’हे प्रभावी औषध आहे. सप्टेंबरमध्ये या आजाराचे रुग्ण वाढण्याची शक्यता आहे. या आजाराचा पहिल्या रुग्णाची नोंद २०१२ मध्ये केली होती.
-डॉ. पी. पी. जोशी, प्रमुख, मेडिसीन विभाग ‘एम्स’