पेंचचे पाणी कालव्याऐवजी नदीत
By Admin | Updated: October 19, 2014 00:59 IST2014-10-19T00:59:24+5:302014-10-19T00:59:24+5:30
मौदा तालुक्यातील धानाला सध्या पाण्याची नितांत गरज आहे. पावसाने दडी मारल्याने पेंच प्रकल्पातील पाणी ओलितासाठी उपलब्ध होईल, अशी शेतकऱ्यांना अपेक्षा असतानाच पाटबंधारे विभागातील

पेंचचे पाणी कालव्याऐवजी नदीत
सांडनदीला पूर : पाण्याअभावी धान सुकण्याच्या मार्गावर
तारसा : मौदा तालुक्यातील धानाला सध्या पाण्याची नितांत गरज आहे. पावसाने दडी मारल्याने पेंच प्रकल्पातील पाणी ओलितासाठी उपलब्ध होईल, अशी शेतकऱ्यांना अपेक्षा असतानाच पाटबंधारे विभागातील अधिकाऱ्यांनी प्रकल्पातील पाणी कालव्यांऐवजी नदीनाल्यात सोडणे पसंत केले. त्यामुळे तारसा-बाबदेव मार्गावरील सांडनदीला पूर आला.
मौदा तालुक्यात धानाचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. सध्या धान गर्भावस्थेत अर्थात धानाच्या लोंब्यामधील दाणे भरण्याच्या अवस्थेत आहे. अशा परिस्थितीत धानाला पाण्याची नितांत गरज असते. या काळात पाणी न मिळाल्यास दाणे भरण्याची प्रक्रिया मंदावते किंबहुना; धान सुकण्याची शक्यताही नाकारता येत येत नाही. भारनियमनामुळे शेतातील विहिरीतील पाण्याचा वापर ओलितासाठी करणे शक्य नसल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांनी पेंच प्रकल्पातील पाणी कालव्यात सोडून ते ओलितासाठी देण्याची मागणी पाटबंधारे विभागातील अधिकाऱ्यांकडे अनेकदा केली.
मात्र, संबंधित अधिकाऱ्यांनी या प्रकल्पातील पाणी कालव्यात न सोडता ते नदीनाल्यात सोडणे पसंत केले. त्यामुळे लहान नाल्यांसोबतच सांडनदीही सध्या दुथडी भरून वाहत आहे.
शेतातील विहिरींमध्ये हल्ली भरपूर पाणीसाठा आहे. परंतु ६ तासांच्या नावाखाली १० ते १५ तास वीजपुरवठा रोज खंडित केला जातो. वीजपुरवठा सुरळीत झाल्यानंतरही पूर्णदाबाची वीज मिळत नाही. त्यामुळे मोटारपंप जळण्याचे प्रकार वाढले आहेत.
थ्री फेज वीजपुरवठा रात्री १२ ते सकाळी १० वाजेपर्यंत सुरळीत असतो. सुरळीत करण्यात आलेला वीजपुरवठा मध्येच कधी खंडित होईल, याचाही भरवसा नसतो. त्यानंतर खंडित केला जातो. ज्यांच्या शेतात ओलिताची साधने आहेत, ते शेतकरी रात्र जागून धानाचे ओलित करीत असल्याचे दिसून येते.
विजेच्या लपंडावामुळे गावातील नळ योजना प्रभावित झाल्या आहेत. परिसरातील बहुतांश गावांमध्ये सध्या तीन ते पाच दिवसाआड नळ सोडले जातात. त्यामुळे महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. विजेअभावी ग्रामीण भागातील आरामशीन, वेल्डिंग वर्कशॉप यासह अन्य व्यवसायधंदे बंद राहात असल्याने त्यांच्या उत्पन्नावर विपरीत परिणाम होत आहे. (वार्ताहर)